तुकोबा म्हणतात नामातच सर्वकाही आहे किंबहुना नामच सर्वकाही आहे आणि मुख्य म्हणजे 'ब्रह्मज्ञान' किंवा 'आत्मज्ञान' होण्यासाठी देखील येथे नामाखेरीज अन्य सोपे साधन नाही आणि पूर्वी देखील हे सर्व संतांनी त्यांच्या अभंगांतून वारंवार सांगितले आहे.
येथे 'आत्मज्ञान होणे' म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःचे ज्ञान होणे, आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होणे, जे ज्ञान कोणत्याही ग्रंथाचे किंवा पुराणांचे वाचन किंवा पारायणे करून होत नाही, ते केवळ देव देऊ करत असलेल्या अनुभूतीतूनच नुष्याला/भक्ताला/साधकाला हळूहळू आकळत जाते.
आणि मुख्य म्हणजे संतांनी आपले खरे स्वरूप काय आहे किंवा असते हे खूप आधीच सांगून ठेवले आहे, ते म्हणतात ‘अहं ब्रह्म’, म्हणजे मी ब्रह्म आहे, ब्रह्मरूप आहे, म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास मी देवरूप आहे किंबहुना मी देवच आहे.
म्हणजे आपले खरे स्वरूप दुसरे-तिसरे काहीही नसून ब्रह्म/परब्रह्म/देव आहे, म्हणजे आपण आपल्या अंतरमनात दडून बसलेल्या देवासमान आहोत किंबहुना देवच आहोत, परंतु भगवान श्री कृष्ण ज्ञानेश्वरीत म्हणतात की ह्या संसारातील मायेमुळे मनुष्याच्या दृष्टीआड पडळ येऊन तो मायेच्या पल्याड असलेल्या आपल्या खऱ्या रुपाला पाहू शकत नाही, त्याला अनुभवू शकत नाही, त्यासाठी त्याला परमार्थात गती येणे आवश्यक असते आणि त्यासाठी साधना करावी लागते.
परंतु देवाने नाम हे मनुष्याला असे काही साधन दिले आहे जे सर्व साधनांमध्ये सर्वात सोपे साधन असून त्याने ह्या संसारात काहीही साध्य होऊ शकते किंबहुना त्याने अशक्य असे काही राहतच नाही.
कारण देवाचे नाम घेणे हे त्याला हाक मारल्यासारखेच असून तो एवढा कृपाळू आणि दयाळू आहे की भक्तीभावाने मारलेल्या हाकेला तो नेहमी ओ देतो किंबहुना त्याच्या ह्या ओ पासूनच ओंकाराचा जन्म किंवा उगम झाला आहे.
आणि म्हणून तुम्ही जितके त्याला हाक माराल, त्याचे नाम घ्याल किंवा त्याच्या नामाचे स्मरण कराल तितके त्याला तुमच्या हाकेला ओ द्यावे लागेल आणि त्यानिमित्ताने मग तुम्हांला मायेपलीकडे/ह्या प्रकृतीच्या पल्याड असलेल्या देवाला किंवा तुमच्या खऱ्या स्वरूपाला आधी नाद ब्रह्मातून अनुभवता येईल. म्हणजेच त्याने दिलेल्या हाकेच्या माध्यमातून त्याची प्रचीती येऊन हळूहळू तुम्हांला त्याची चाहूल देखील लागेल, तेथे कोणीतरी खरच आहे हे जाणवू लागेल आणि तो देऊ करत असलेल्या अनुभूतीतून तुम्हांला त्याचे अस्तित्व चराचरात दिसू लागेल.
आणि म्हणूनच 'आत्मज्ञान होणे' हे अन्य काहीही नसून 'देवाला प्राप्त करून घेणे', त्याची ओळख होणे किंवा आपल्याला आपलीच ओळख होणे असे म्हणतात.
आणि ज्याप्रमाणे दैनंदिन आयुष्यात एखाद्या व्यक्तीला प्राप्त करण्यासाठी, त्याला आपलेसे करून घेण्यासाठी किंवा त्याला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी जसे आपण त्याचा पिच्छा पुरवतो, त्याच्या पाठी लागतो, त्याच्याशी सलगी करतो, त्यावर प्रेम करतो किंबहुना प्रेमाचा वर्षावच करतो आणि हे सर्व करताना नकळतपणे त्याच्या नामाचा जप करतो, येथे देखील अगदी तसेच आहे.
आत्मज्ञान होणे म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून देवाला प्राप्त करणे, त्याला आपल्या प्रेमात पाडण्यासारखेच आहे, त्याला वश करून घेण्यासारखे आहे किंबहुना त्याला वश करून आपल्या अधीन करण्यासारखे आहे आणि एकदा का तो वश झाला की मग सगळेच सोपे होऊन जाते. त्यानंतर सर्व अलौकिक अनुभव एकापाठोपाठ येऊ लागतात.
म्हणजेच अशा ह्या आत्म्याचे ज्ञान होण्यासाठी, म्हणजेच 'आपण शरीर नसून आत्मा आहोत’ ह्याची जाणीव होण्यासाठी येथे नामाखेरीज अन्य कोणतेही साधन नाही आणि हे खुद्द देवानेच म्हणजे श्री हरि कृष्णाने स्वतःच गीतेत सांगितले आहे.
आणि मुख्य म्हणजे ह्या संसारात काहीही प्राप्त करण्यासाठी मनुष्य यज्ञ-याजन, जप-तप ही साधने आचरु शकतो. परंतु 'आत्मज्ञान' ही अशी एकच गोष्ट आहे जी केवळ देवाच्याच ताब्यात असून केवळ तोच ती साधकाच्या पदरी घालू शकतो आणि तेदेखील साधकाच्या खऱ्या भक्तीचे किंवा त्याच्यावरच्या निस्सीम प्रेमाचे फळ म्हणून. इतर कोणत्याही कारणासाठी नाही.
आणि म्हणून नामाला एवढे महत्व प्राप्त झाले असून त्याचा महिमा थोर आहे आणि तीच आपण यापुढे तुकोबांच्या अभंगांद्वारे पाहणार आहोत. ते मनुष्याला/साधकाला परमार्थात प्रत्येक टप्प्यावर कसे साहाय्य करते, कशी उंची मिळवून देते आणि साधकाला कसे भयविरहीत देखील करत जाते हे देखील पाहूयात.
ह्यापुढील निरूपणासाठी खालील link वर click करावे..
https://www.shritukaramgatha.com/2021/09/blog-post.html