अद्वैत म्हणजे द्वैत जाऊन सर्वकाही एकच आहे ह्याचा अनुभव येणे आणि तसा तो येण्यासाठी आधी तशी दृढ भावना हवी तेव्हाच कोठे हळूहळू तशी अनुभूती येऊ लागते आणि ती येण्यासाठी देखील मनुष्याची वृत्ती विरक्तीकडे झुकणारी हवी आणि तशी ती झुकण्यासाठी आधी सर्व गोष्टी, पदार्थ, व्यक्ती ह्यांना समान लेखण्याचा स्वभाव हवा, सर्वांविषयी आपुलकीची भावना निर्माण व्हावयास हवी जेणेकरून मग आपपर भाव कमीकमी होत जातो किंबहुना मग ते ओघानेच येते, तेव्हाच मग त्यांच्यावरचा लोभ कमी होऊन मन शांत आणि निश्चल होऊ लागते, ते एकाठिकाणी स्थिरावते किंबहुना विरक्ती तेव्हाच येते जेव्हा ह्या संसाराचे, येथील मायेचे खोटेपण लक्षात येते आणि त्याच्या नाशिवंत स्वभावाचा वीट येऊ लागतो, कारण येथे सर्व काही नाशिवंत आणि क्षणभंगुर आहे ह्याचा जर वीट नाही आला तर मनुष्य ह्या मायेतच अखंड गुंतून राहण्याची शक्यता असते किंबहुना तो वीट यावा आणि अवीटाची गोडी लागावी यासाठीच तशी योजना असते, परंतू तरीदेखील मनुष्याला मायेचा सहसा कंटाळा येत नाही कारण माया असतेच तशी, तिचा प्रभाव असतोच थोर, आणि म्हणून त्यासाठी देवाची कृपा होणे गरजेचे आहे, स्वतःहून किंवा स्वबळावर कोणीही ह्या मायेच्या जोखडातून सुटू शकत नाही आणि एकदा का तशी सुटका झाली की पुढे त्याविषयी चाललेली चर्चा देखील कानाला नकोशी वाटते किंबहुना त्याविषयी मनी वमन म्हणजेच ओकारीची भावना येऊ लागते.

असो.

आता ही गोष्ट नेमकी अनुभव आल्याशिवाय समजणे अशक्य आहे तरीपण जरा सोपी करून सांगण्याचा प्रयत्न करतो, बघा समजतंय का ते....

येथे एरव्ही सगळेजण द्वैतभावात जगत असतात म्हणजेच प्रत्येक दोन व्यक्तीत आणि गोष्टीत आपण अंतर मानतो किंबहुना आपण वेगळे आणि आपल्यापेक्षा इतर लोक वेगळे, आपल्यात समान असे काहीच नाही असे आपण समजतो परंतु जेव्हा द्वैत जाते आणि सर्वकाही एकच आहे असे दिसून येते तेव्हा... परंतु असे तेव्हाच दिसावयास लागते जेव्हा तसा अनुभव येऊ लागतो आणि येथेच खरी गोम आहे... असा अनुभव येऊ तरी कसा शकतो?…. म्हणजे नेमके होते तरी काय ज्यामुळे सर्वकाही एकच आहे ह्याची खात्री पटते... तर येथे सांगायचे म्हणजे ह्याचा अनुभव अक्षरशः शरीराला येऊ लागतो आणि ते देखील इंद्रियांमार्फत.

उदा. जेव्हा एखाद्याला लागते आणि त्यामुळे त्याला ज्या कमालीच्या वेदना होतात तेव्हा त्या वेदना ज्याला लागले-खुपले आहे त्यालाच कळू शकतात, इतरांना नाही, परंतु ज्याला ऐक्यभावाचा अनुभव आला आहे त्याला त्या व्यक्तीचे शारीरिक दुःख तेवढ्याच तीव्रतेने कळू शकते, एवढेच नव्हे तर त्याचे मानसिक दुःखदेखील त्यांना तेवढ्याच क्षमतेने कळू शकते जेवढे ते त्या व्यक्तीला होत असते आणि त्याचा परिणाम देखील अशा ह्या ज्ञानी मनुष्याच्या शरीरावर होऊ शकतो. ज्याप्रमाणे आपल्या मनाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो तसाच आपले दुःख पाहून तो त्यांच्या शरीरावर देखील होऊ शकतो आणि म्हणूनच जेव्हा रेड्याला मारले तेव्हा त्याचे व्रण माउलींच्या (ज्ञानेश्वरांच्या) शरीरावर उमटले आणि मनावर देखील त्याचा परिणाम झाला.

परंतु असा अनुभव येण्यासाठी मनुष्याला आधी विरक्ती यावी लागते आणि एकदा का विरक्ती आली की मग त्याच्या सुखदुःखाच्या कल्पनाच बदलतात, कारण त्याच्यासाठी दुःख उरतच नाही, सत्य कळल्याने तो दिवसेंदिवस अधिकाधिकच सुखी होत जातो, इतर साधारण लोकांसारखा सांसारिक गोष्टींसाठी तो हाव धरत नाही आणि त्यासाठी रडत देखील बसत नाही. त्याची मनाची स्थिती एवढी पालटते की मग त्याला उमजेनासेच होते की लोकं येथे व्यर्थ का रडत आहेत, कोणाला काही मिळाले नाही म्हणून तर कोणी सोडून गेला म्हणून तर कोणी मेला म्हणून... जसे एखादी व्यक्ती चित्रपट बघताना त्यात घडणाऱ्या गोष्टी खऱ्या आहेत हे समजून व्यर्थ रडत बसते आणि ज्याला हे ठाऊक असते तो मग ते पाहून कपाळाला हात लावतो अगदी तसेच...

परंतु हळूहळू अशी ही विरक्ती आलेला मनुष्य स्वतःच्या मुळाकडे वाटचाल करू लागतो आणि त्याची शारीरिक जाणीव कमी कमी होत जाते आणि त्याच्या स्वरूपाची जाणीव वाढू लागते आणि त्याचा परिणाम म्हणून तो त्याच्या स्वरूपाशी एकरूप होऊ लागतो (म्हणजेच आत्म्याशी, कारण आपण शरीर नसून आत्मा आहोत, तेच आपले मूळ असून तेच आपले खरे स्वरूप आहे. 'अहं ब्रह्म' म्हणजे 'मी ब्रह्म आहे' हे सर्वांनीच ऐकले असेल) आणि पुढे जेवढा तो आत्म्याशी एकरूप होतो तेवढी त्याची व्याप्ती वाढत जाते. (येथे सर्वांच्याठायी एकच आत्मा असतो, माझा आत्मा वेगळा आणि तुझा वेगळा असे नाही. आणि आकाश जसे सर्वत्र समान असते तसेच आत्मा देखील सर्व चराचरात (चर आणि अचर ह्या दोहोंतदेखील) असून प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये असतो. आणि ह्या आत्म्यालाच आपण 'ब्रह्म' असे म्हणतो, त्यालाच 'परब्रह्म' हे देखील नाव असून त्यालाच आपण 'देव' असे म्हणतो.)

तर असा हा मनुष्य जेव्हा आत्म्याशी एकरूप होऊ लागतो तेव्हा त्याला आपण सर्व गोष्टींमध्ये आहोत असे दिसू लागते. आणि इथे सर्वकाही आत्माच असल्याने म्हणजे सर्वकाही ब्रह्मच असल्याने आणि ते सर्वात संचरुन असल्याने त्याला त्याद्वारे मग सर्वांची(चर आणि अचर ह्या सर्वांची) सुखदुःखे कळू लागतात आणि त्याद्वारे वेदनाही होऊ लागतात आणि म्हणूनच एखादा पीडित मनुष्य जसा आपल्या पीडा दूर करण्यासाठी स्वतःच कष्ट उपसतो त्याप्रमाणेच ही ज्ञानी लोकदेखील (ज्यांना 'आत्मज्ञान' झाले आहे म्हणजेच आपण 'शरीर' नसून 'आत्मा' आहोत ह्याचे ज्ञान झाले आहे) दुसऱ्यांचे दुःख निवारण करण्यासाठी कष्ट उपसतात कारण ते त्यांना स्वतःलाच होत असतात आणि अशारितीनेच मग पुढे जाऊन त्यांच्यामध्ये उच्चकोटीच्या भावना येतात किंवा निर्माण होतात ज्यांना आपण दया, क्षमा, शांती असे म्हणतो आणि म्हणून त्यांचा स्वभावदेखील इतरांना परोपकारी वाटतो परंतु असे असले तरीही ते कोणावरही उपकार करत नसतात. कारण मनुष्य जेव्हा स्वतःसाठी काही करतो तेव्हा काय तो स्वतःवर उपकार करत नसतो. आणि म्हणूनच हे ज्ञानी (संतसज्जन, साधूजन) लोक कोणताही मोठेपणा किंवा त्याचा ताठा मिरवत नाहीत किंवा मिरवताना दिसत नाही कारण तशी त्यांच्याठायी कधी भावनाच उत्पन्न होत नाही. सर्वकाही एकच आहे ही त्यांना येणाऱ्या अनुभवाने खात्रीच पटत चालली असते.

परंतु कोणाला आता असे वाटेल की येथे तर अनेक लोक वेदनेने पिडलेले आहेत आणि अशा सर्वांचा परिणाम ह्या व्यक्तीवर झाला पाहिजे, आणि ह्याचे उत्तर देखील 'हो, तो तसाच होत असतो' असेच आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे तसा जर तो होत राहिला तर अशी व्यक्ती जगणारच नाही, सर्वांच्या वेदनेने मरूनच जाईल आणि मेलीच तर आत्मज्ञानाचे सुख मग कसे अनुभवेल. तर ह्यालाच म्हणतात देवाची खरी किमया. ह्यांच्या मुखी जे नामस्मरण चालू असते, त्यामुळे ह्यांची मनाची पाटी क्षणाक्षणाला कोरी होत असते आणि त्यावर उमटत असलेले वेदनेचे व्रण जाऊन देवाकडून मिळणाऱ्या निस्सीम प्रेमाला किंबहुना त्या प्रेमाच्या ओघामध्ये ते आणि त्यांचे मन सतत न्हाऊन निघत असतात आणि म्हणून सदैव आनंदी असतात. कारण देव जसा सर्वत्र असून उदासीनासारखा वावरत असतो, ह्यांना देखील तो अगदी स्वतःसारखेच करून सोडतो. किंबहुना देवाचाच संपूर्ण स्वभाव त्यांच्या वाट्याला देखील येतो आणि म्हणूनच ते असे निश्चिन्तपणे येथे संसारात वावरू शकतात.

Shri Tukaram Gatha

या प्रश्नासाठी 2 इतर उत्तरे पहा