योगीता चव्हाण साठी प्रोफाइल फोटो

अध्यात्म म्हणजे ब्रह्माचा/आत्म्याचा स्वभाव, ज्याचा अनुभव येण्यासाठी येथे लोकं/साधक परमार्थाला लागतात. मनुष्याचा जसा एक विशिष्ट स्वभाव आहे/असतो तसाच ब्रह्माचा/आत्म्याचादेखील एक स्वभाव आहे.

उदा. पाण्याचा जसा एक स्वभाव असतो किंवा गुणवैशिष्ट्ये असतात परंतु त्याच पाण्याचे जेव्हा गोठून बर्फात रूपांतर होते तेव्हा त्याची गुणवैशिष्ट्ये सर्वार्थाने बदलतात. त्याचप्रमाणे मनुष्याचे जेव्हा ब्रह्म्यात परिवर्तन होते किंवा त्याला जेव्हा हळूहळू आत्मानुभूती येऊ लागते (म्हणजेच आपण देह नसून आत्मा आहोत असे जेव्हा त्यास हळूहळू आकळू लागते) तेव्हा त्याचा स्वभावादेखील मग हळहळू पालटू लागतो आणि अंती तो जेव्हा पूर्णब्रह्म होतो तेव्हा त्याच्याठायी मनुष्याचा स्वभाव न राहता संपूर्ण स्वभाव 'ब्रह्माचा' येतो.

परंतु हे ब्रह्म मनुष्याला त्याच्याठायी असलेल्या साधारण इंद्रियांनी आकळता येत नाही किंवा त्याचा स्वभाव त्याला सर्वसाधारण इंद्रियांमार्फत अनुभवता येत नाही, त्यासाठी त्याच्यापाशी अतींद्रिय असावे लागते, परंतु जसजसे साधारण मनुष्याचे ब्रह्मात रूपांतर होण्यास सुरुवात होते तसतसे त्याला अतींद्रियदेखील लाभत जाते.

म्हणजेच ज्याप्रमाणे साधारण इंद्रियांमार्फत मनुष्य स्वतःचा मनुष्यपणा अनुभवतो तसेच अतींद्रिय ब्रह्म अनुभवण्याच्या कामी उपयोगात येते आणि ब्रह्माचा स्वभाव नेमका काय आणि कसा असतो हे जाणून घेण्यासाठी आत्म्याचा स्वभाव पाहावा त्यात तो सविस्तररित्या वर्णन केलेला आहे.

ब्रह्म/आत्मा म्हणजे काय?

असो.

उदा. मनुष्याचा पहिला स्वभाव जसा आसक्ती आहे/असतो जी त्याला वयाच्या साधारण पहिल्या दोन वर्षांत यावयास लागते (जेव्हा तो आजूबाजूच्या गोष्टी पाहून त्यावर हक्क सांगू लागतो, मी-माझे करण्यास सुरुवात करतो, उदा. स्वतःची खेळणी इतरांबरोबर वाटून घेत नाही वगैरे) त्याप्रमाणेच ब्रह्म असल्याचा पहिला अनुभव अनासक्ती असतो (detachment). ज्यांना कोणाला आपण परमार्थाच्या योग्य वाटेवर आहोत की नाही हे जाणून घ्यायचे असेल त्यांनी हि चाचणी करून पाहावी. जर ठायी अनासक्तीचा जन्म झालेला नसेल तर समजावे की आपण अजून पहिली पायरी देखील गाठलेली नाही.

असो.

म्हणजेच ठायी अनासक्तीचा जन्म होताच त्याला हळूहळू आपण ह्या मायेतून मुक्त होताना दिसू लागते, सर्व बंधनातून सुटत चालल्याचे भासू लागते, भौतिक गोष्टींचा पूर्वी जसा मनावर, शरीरावर परिणाम व्हायचा तसा होताना आता दिसेनासा होतो. आणि पुढे पुढे तर कोणतीही वस्तू/गोष्ट/व्यक्ती त्याला स्वतःठायी गुंतवून ठेवू शकत नाही, त्याने स्वतःदेखील तसा कितीही प्रयत्न केला तरीही. आणि अशी ही अनासक्ती जन्माला आल्यामुळे त्याच्याठायी असलेले विकारदेखील मग हळूहळू नाहीसे होण्यास सुरुवात होते, विषयवासना आटत जातात आणि त्यामुळे मग क्रोधदेखील हळूहळू नाहीसा होतो आणि शेवटी संपुष्टातच येतो (विषय भोगणे हा सर्वथा मनुष्याचा स्वभाव आहे, ब्रह्माचा त्याच्याशी काहीही संबंध नाही), आणि पुढे ह्या सर्वाचा परिणाम म्हणून भौतिक गोष्टी आणि वस्तूंवरील लोभ कमी-कमी होत गेल्यामुळे तो पुढे कोणत्याही गोष्टीचा संचय करणे बंद करतो, अशारितीने ठायी असलेल्या सर्व इच्छा-आकाशांदेखील संपुष्टात येण्यास सुरुवात होते. अशाप्रकारे त्याचा मनुष्यपणा कमीकमी होत जाऊन त्याची ब्रह्माकडे वाटचाल होण्यास सुरुवात होते. ब्रह्म जसे निर्विकार(विकार रहित), उदासीन आणि सर्वव्यापी असते त्यालादेखील ठायी उत्पन्न झालेल्या अतींद्रियांमुळे तसाच अनुभव येऊ लागतो.

म्हणजेच आपण देखील चराचरातील सर्व गोष्टींमध्ये आहोत असे त्यास दिसू लागते, किंबहुना सर्व काही एकच असून आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत असे त्यास जाणवू लागते आणि त्याचा परिणाम म्हणून इतर प्राण्यांना, जीवजंतूंना, झाडावेलींना झालेल्या दुःखाचे/दुखापतींमुळे त्याच्या शरीरावर आणि मनावर आघात बसू लागतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी त्याच्यापोटी कळवळा दाटून येऊ लागतो आणि ह्या सर्वामुळे इतर प्राणी किंवा सर्वच भूतजात आपल्यापासून वेगळे आहेत हा त्याचा भ्रमच नाहीसा होऊ लागतो, त्याचे मन कोणत्याही दोन गोष्टींमध्ये भेदभाव करणे बंद करते, ज्याचा परिणाम म्हणून त्याच्याठायी असलेला आपपर भावदेखील सर्वार्थाने संपुष्टात येतो. म्हणजेच हे आपले, ते परक्याचे ही जाणीव, तसा भावच नष्ट होतो.

म्हणजेच अशाप्रकारे सर्व काही एकच आहे हे जाणवल्यामुळे मग कोणापासूनही त्याला कसलेच भय राहत नाही. (म्हणजेच सर्वकाही आपलेच स्वरूप असल्याने किंवा आपणच सर्वरूप असल्याने स्वतःला स्वतःचे काय ते भय उरणार?) आणि अशारितीने मनुष्याच्या दुःखाला कारणीभूत असलेले भयच गेल्याने ठायी आनंद वाढून तो दिवसेंदिवस वृंध्दीगंत होत जातो. आणि शेवटी तोच परमानंदाचे स्वरूप धारण करतो आणि तीच परमार्थाची उच्च स्थिती, तीच खरी उच्च अवस्था जीला ब्रह्माची सहज स्थिती म्हणून संबोधितात. म्हणजेच ब्रह्म सदोदित त्याच स्थितीत असते म्हणून.

परंतु वरील सांगितलेले बदल क्रमाक्रमानेच घडून येतात म्हणून अशा साधकाला परमार्थात क्रमयोगी म्हणतात.

(काम-क्रोध-लोभ-मद-मत्सर-अहंकार हा मनुष्याचा स्वभाव आहे, ब्रह्माचा नाही, ब्रह्म हे उपाधिरहित असून निर्विकार आहे, आत्म्याचा स्वभाव वाचल्यावर त्याचा स्वभाव कळून येईल.)

आत्मा म्हणजे काय?

म्हणून माउली ज्ञानेश्वरीत म्हणतात की तुम्हां श्रोत्यांना अरुपाचे रूप पाहण्यासाठी किंवा संपूर्ण ब्रह्म अनुभवण्यासाठी जरी अतींद्रिय लाभले नसले तरीदेखील ह्या ज्ञानेश्वरीत मी त्याचे असं काही निरूपण करिन की मी त्याचा स्वभाव तुम्हांला तुमच्यापाशी असलेल्या सर्वसाधारण इंद्रियांकडूनच भोगवीन.


तुकाराम महाराजांच्या कित्येक अभंगावरून देखील हे स्पष्ट होते आणि म्हणूनच असे अभंग सर्वसाधारण लोकांना कळून येत नाहीत कारण त्यांना हेच कळत नाही ते नेमके कशाबद्दल बोलत आहेत.

उदा. ब्रह्म कोठूनही कोठेच जात नाही, म्हणजेच ते एकाच जागी स्थिर आहे जसे आकाश किंवा एखादा रस्ता, म्हणजेच मनुष्य प्रवास करतो, रस्ता जागच्या जागीच असतो त्याप्रमाणेच.

काहीच मी नव्हे कोणीये गांवीचा । एकटा ठायींचा ठायी एक ।।

नाही जात कोठें येत फिरोनिया । अवघेचि वायाविण बोले ।।

नाही मज कोणी आपुले दुसरे । कोणाचा मी खरे काही नव्हे ।।

नाही आम्हां ज्यावे मरावे लागत । आहो अखंडित जैसे तैसे ।।

तुका म्हणे नाव रूप नाही आम्हां । वेगळा त्या कर्मा अकर्मासी ।।

तुकाराम महाराज म्हणतात मी कोणीही नसून कोणत्या एका गावाचाही नाही, मी जेथे पहिल्यापासून आहे अजूनही मी तेथेच आहे. मी कोठेही जात नाही किंवा कोठून आलो आहे असेही नाही, मी जे काही बोलत आहे, सांगत आहे ते देखील निरर्थक असून सर्व व्यर्थ जाते आहे. मला स्वतःचे असे कोणीच नसून मी देखील कोणाचाही नाही(ह्यालाच म्हणतात उपाधिरहित असणे.). आम्हाला जन्म घ्यावा लागत नाही आणि मृत्यूही येत नाही, आम्ही जसे होतो तसेच अजूनही अखंडित आहोत.

तुकोबाराय म्हणतात की एवढेच नव्हे तर आम्हाला नाव नाही, रूप नाही आणि कोणते कर्मदेखील आम्ही करत नाही किंबहुना सर्व कर्मजातीपासून किंवा कर्म-अकर्मापासून आम्ही वेगळे आहोत. (थोडक्यात म्हणजे आम्ही देह नसून आत्मा आहोत.)


बोलो अबोलणे मरोनिया जिणे । असोनि नसणे जनी आम्हा ।।

भोगी त्याग जाला संगीच असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ।।

तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा । पुसणे ते पुसा पांडुरंगा ।।

तुकाराम महाराज लोकांना उद्देशून म्हणतात की जरी मी तुम्हाला येथे बोलताना दिसत असलो तरी मी खरा बोलत नाही, म्हणजे मी व्यावहारिक दृष्टीने बोलत असून आत्मदृष्टीने मी केव्हाच अबोल झालो आहे. ते म्हणतात माझ्याठायी देह असल्यामुळे मी ह्या संसारात जिवंत वाटत आहे परंतु देहभाव मात्र नष्ट झाल्यामुळे मी येथे जनांत असूनदेखील नसल्यासारखाच आहे.

तसेच ते म्हणतात की माझा देह अजूनही शाबूत असल्यामुळे मी येथे चारचौघात तुम्हांला वावरताना दिसतो, व्यावहारिक दृष्टीने संसाराचा भोग घेताना दिसतो परंतु वाट्याला आलेले भोग मग हे चांगले असो किंवा वाईट, शरीर असल्यामुळे त्याचा भोग घेणे आवश्यकच होऊन जाते परंतु मी काही ते भोग खऱ्याअर्थाने भोगत नाही किंवा त्यांच्या परिणामांनी माझे चित्तदेखील दुःखी-कष्टी किंवा हुरळून जात नाही. त्यामुळे खऱ्याअर्थाने माझ्यासाठी हे सर्व भोग त्यागासमानच झाले असून मी एरव्हीदेखील कितीही कोणाच्या संगतीत जरी वाटत असलो तरीही सर्वथा एकटाच आहे. माझे बाहेर जाणारे आणि आत येणारे सर्व मार्ग तुटले असून सगळे पाशदेखील गळून पडले आहेत.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की त्यामुळे जरी मी तुम्हाला व्यावहारिक जीवनात दिसत असलो किंवा जिवंत वाटत असलो तरीही आणि कितीही दैनंदिन आयुष्य जगताना वाटलो तरीही तो मी नाही किंबहुना मी आधी होतो तसा आता आजीबात राहिलेलो नाही, संसारात असून नसल्यासारखा आहे किंबहुना ह्या विश्वात असूनदेखील नसल्यासारखाच आहे किंबहुना मी येथे नाहीच आणि जर का हे तुम्हाला खरे वाटत नसेल तर तुम्ही खुशाल पांडुरंगाला विचारू शकता.


ब्रह्मरुपाची कर्मे ब्रह्मरुप । विरहित संकल्प होती जाती ।।

ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणी ।।

नानाभाषामते आळविता बाळा । प्रबोधी तो मूळा जननीठायी ।।

तुका म्हणे माझे नमन जाणतिया । लागतसे पाया वेळोवेळा ।।

तुकाराम महाराज म्हणतात जी व्यक्ती स्वतः ब्रह्मपदास जाऊन पोहचली आहे, स्वतः ब्रहरूप झाली आहे तिच्या हातून घडलेली सर्व कर्मेदेखील ब्रह्मरूपच असतात कारण ती कोणत्याही संकल्पाशिवाय केलेली असतात. परंतु इतरांची कर्मे मात्र संकल्प प्रकारात मोडतात कारण ती सकाम असल्यामुळे म्हणजेच त्यातून फळ अपेक्षित असल्यामुळे अशा कर्मांना संकल्प म्हणतात आणि एक संकल्प पूर्णत्वास गेल्यावर व्यक्ती दुसरा करण्यास तयार असते.

ते म्हणतात जसा स्फटिक मणी रंगांच्या सानिध्यात ठेवला असता त्या रंगाचा प्रभाव त्यावर पडून तो मग त्या रंगाचा भासतो परंतु तसे नसून तो मणी खऱ्याअर्थाने उपाधिरहित असतो. तसेच ते म्हणतात एखाद्या लहान बाळाला इतरांनी कितीही वेगळ्या नावाने किंवा भाषेत हाका मारल्या तरी ते ओळख दाखवत नाही परंतु स्वतःच्या मातेला मात्र लगेचच ओळखते.

तुकोबाराय म्हणतात जाणत्या लोकांचे म्हणजेच ज्ञानीलोकांचे देखील अगदी तसेच असते, ते कितीही सामान्यांसारखी भासत असली तरी ते इतरांपेक्षा वेगळी असतात, प्रामुख्याने उपाधीरहित असतात आणि त्यांची कर्मेदेखील निरपेक्ष आणि निष्काम असतात. ते म्हणतात अशांना माझा नमस्कार असून मी त्यांच्या पायी वेळोवेळा दंडवत घालतो आणि घालत राहीन.

*(येथे ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी, पुस्तकी ज्ञानी नव्हे )


मुक्त कासया म्हणावे । बंधन ते नाही ठावे ।।

सुखे करितो कीर्तन । भय विसरले मन ।।

देखिजेना नाश । घालू कोणावरी कास ।।

तुका म्हणे साहे । देव आहे तैसा आहे ।।

तुकाराम महाराज म्हणतात मुक्ती कशाला म्हणतात किंवा बंधन काय असते हे आता मला माहीतच नाही कारण माझे स्वरूपच आता संपूर्णपणे पालटल्याने माझे आधीचे स्वरूप म्हणजेच मी आधी कसा होतो (बंधनात होतो किंवा मुक्तीसाठी प्रयत्न करत होतो) हे मला साधे आठवतसुद्धा नाही. ते म्हणतात माझे मनदेखील आता भय विसरले असून मी फक्त सुखाने देवाचे कीर्तन करतो, नामस्मरण करतो.

ते पुढे म्हणतात की माझ्याठायी आता मला कसलाही नास होताना किंवा घात घडताना दिसत नाही (माझ्या देहाचाही नाही, कारण माझी देहबुद्धी तर केव्हाच संपुष्ठात आली आहे.) त्यामुळे मी त्यासाठी म्हणजेच देहासाठी देवाची भक्ती करत नाही, त्यामुळे त्याला व्यर्थ साकडे घालण्याची तर गोष्टच येथे येत नाही.

तुकोबाराय शेवटी म्हणतात माझ्यासाठी देव मात्र आधी होता तसाच आहे, त्याच काडीचाही बदल झालेला नाही.


परंतु ते म्हणतात की हे ब्रह्म तेव्हाच दिसावयास लागते जेव्हा द्वैत जाते आणि द्वैतदेखील तेव्हाच जाते जेव्हा श्री नारायणाची कृपा होते.


देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सुख येथे नाम आहे ।।

ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले । शरीर ते झाले ब्रह्मरूप ।।

यजन याजन तप व्रत करिती । विकल्पे नागविती शुद्ध पुण्या ।।

तुका म्हणे सर्व सुख येथे आहे । भ्रांति दूर पाहे टाकुनिया ।।

तुकाराम महाराज म्हणतात लक्ष देऊन विचार केलात तर असे आढळेल की येथे माणसाला मिळालेल्या सुंदर देहापेक्षा कितीतरी पटीने सुख नामात आहे, नामस्मरणात आहे. जेव्हा द्वैत बुद्धीचा निरास होतो तेव्हा ब्रह्म साक्षात्कार होऊन देह ब्रह्मरूप होतो, ब्रह्मात देह विलीन होतो.

ते म्हणतात इथे कितीतरी लोक व्रत वैकल्य, जपतप करतात परंतु त्यांचा ते करण्यामागे उद्देश वेगळाच असल्याने त्यांच्या पुण्यात कोणत्याही प्रकारची भर पडत नाही. उलट साठलेले पुण्य उगीचच नको त्या ठिकाणी वापरले जाऊन खर्च होते व अशारीतीने स्वतःचा घातच अधिक होतो.

तुकोबाराय म्हणतात जर शांत चित्ताने विचार केलात तर तुम्हाला कळेल की सर्व सुख हे इथेच आहे, डोळ्यांवरचा भ्रमाचा चष्मा काढून टाकलात तर तुम्हाला निश्चितच दिसून येईल.


जरी हा हो कृपा करील नारायण । तरी हेचि ज्ञान ब्रह्म होय ।।

कोठोनियां काही न लगे आणावे । न लगे कोठे जावे तरावया ।।

जरी देव काही धरील पै चित्ती । तरी हेचि होती दिव्य चक्षु ।।

तुका म्हणे जरी देव दावील आपणा । तरी जीवपणा ठाव नाही ।।

तुकाराम महाराज म्हणतात जर श्री हरी नारायणानेच आपल्यावर कृपा केली किंवा करायचे ठरवले तर हेच सामान्य ज्ञान मग आपल्यासाठी आपोआप ब्रह्मज्ञान होईल. ते म्हणतात मग आपल्याला कशासाठीही कोठे जावे लागणार नाही व कोठूनही काही आणावे देखील लागणार नाही. तसेच तरण्यासाठी देखील इतरत्र कोठेही म्हणजेच कोणत्याही तीर्थक्षेत्री देखील जावे लागणार नाही. म्हणेजच बैसल्याठिकाणीच सर्व काही घडून येईल.

ते पुढे म्हणतात आणि जर देवानेच मनात आणले किंवा आपला उद्धार करावा ह्याचा किंचितदेखील विचार जर स्वतःच्या चित्ती धरला तर आपले हेच सर्वसामान्य डोळे मग दिव्य चक्षु होतील व त्यांना दिव्य दृष्टी लाभेल.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की आणि मग देवानेच आपल्याला दाखवल्यावर आपल्यातला संकुचितपणा नष्ट होऊन, मी-माझेपणा जाऊन किंबहुना हा जीवपणाचं जाऊन आपल्याला ही सर्व सृष्टी 'ब्रह्म' दिसावयास लागेल म्हणजेच ब्रह्मस्वरूप दिसावयास लागेल.

Shri Tukaram Gatha

या प्रश्नासाठी 7 इतर उत्तरे पहा