ओंकार डंके साठी प्रोफाइल फोटो

विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडच्या आजवरच्या प्रभावशाली पंतप्रधानांपैकी एक समजले जातात. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या सततच्या हल्ल्यांनंतरही शरण न जाणारा लढवय्या अशी त्यांची ओळख आहे. चर्चिल यांना साहित्याचा नोबेल पुरस्कारही मिळालाय. पूर्णवेळ राजकारणी, अगदी पंतप्रधान बनलेल्या व्यक्तीला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळणे ही खरोखरच दुर्मीळ गोष्ट आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या चर्चिल यांच्या पुतळ्याची त्यांच्याच कर्मभूमीत म्हणजे इंग्लंडमध्ये नुकतीच विटंबना करण्यात आली. या निमित्ताने चर्चिल यांच्या वादग्रस्त कारकीर्दीचा आढावा घ्यायला हवा. विशेषत: आंदोलकांच्या दाव्यानुसार चर्चिल हे खरोखरच वंशवादी / वर्णद्वेषी होते का? याचेही उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे.

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!

इतिहास हा नेहमी जेते लिहितात हे जागतिक सत्य आहे. दुसऱ्या महायुद्धावरचे गाजलेले हॉलिवूड चित्रपट, BBC चे माहितीपट यामधून 'चर्चिल द ग्रेट' अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. जगाला वाचवणारा नेता अशी चर्चिल यांची महती गायली जाते. त्याचवेळी जगातल्या लाखो निरपराध मंडळींचा बळी घेणारे देखील चर्चिल होते हे देखील सत्य सर्वांना समजले पाहिजे. भारताला चर्चिल यांच्या या दमनकारी राजवटीचा सर्वात जास्त फटका बसलाय.

बंगालचा दुष्काळ आणि चर्चिल

ब्रिटीशांनी भारतामध्ये केलेल्या लुटीचे बंगालमध्ये १९४३ साली पडलेला दुष्काळ हे अगदी क्लासिक उदाहरण आहे. मधूश्री मुखर्जी यांच्या 'Churchill's Secrect War' या पुस्तकात याचे सविस्तर आणि ससंदर्भ वर्णन केले आहे.

१९४० च्या दशकाच्या सुरुवातीला जपानचे सैन्य भारतीय सीमेवर येऊन धडकले होते. त्यामुळे ब्रिटीशांनी जपानी सैन्याला काहीही हाती लागू नये म्हणून सर्व साधनसंपत्ती नष्ट करण्याचे धोरण स्विकारले होते. त्यात शेतीचे तसेच शेतकऱ्यांच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. त्याचसुमारास आलेल्या चक्रीवादळातही सुमारे ३० हजार नागरिकांचा मृत्यू झाला. जपानच्या लष्कराने भारताला बर्मा आणि थायलंडमधून होणारा अन्नधान्याचा पुरवठा तोडला होता. या कारणांमुळे बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला होता.

या दुष्काळाच्या काळात विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांच्या बाजूने लढणाऱ्या भारतीय सैनिकांच्या देशाची त्यांना कसलीही फिकीर नव्हती. 'भारतीय लोक सशासारखे प्रजनन करतात' असे अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या चर्चिल यांचे वर्तनही त्याच स्वरुपाचे होते.

चर्चिल यांना ब्रिटीश नागरिकांना कसल्याही प्रकारे झळ बसावी हे मान्य नव्हते. युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतर भीषण अन्नटंचाई निर्माण होणार असल्याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांनी ब्रिटनमधील धान्य कोठारे भरण्यावर भर दिला. धान्यांची जहाजं ऑस्ट्रेलियातून भारताला वळसा घालत युरोपकडे जात होती. चर्चिल यांनी ती जहाजे भारतात पाठवण्याचे आदेश दिले नाहीत. भारत लवकरच आपल्या हातून जाणार आहे याची जाणीव झाल्याने साम्राज्यवादी मानसिकतेच्या चर्चिल यांनी भारतीयांच्या जीवाची पर्वा केली नाही.

चर्चिल यांच्या धोरणांमुळे बंगालमधील दुष्काळात सुमारे तीस लाख जणांचा मृत्यू झाला. हिटलरने बारा वर्षांच्या राजवटीत साठ लाख ज्यूंचा नरसंहार केला. त्यामुळे त्याला क्रूरकर्मा म्हंटले जाते. एका वर्षात तीस लाख भारतीयांना मारणाऱ्या चर्चिल यांनाही क्रूरकर्मा म्हंटले तर यात चूक काय?

चर्चिल यांचा वंशद्वेष/ वर्णद्वष हा फक्त भारतीयांबाबतच होता का ? अन्य देशांबद्दल त्यांना काय वाटत होतं पाहूया…

क्यूबा - 'क्यूबा हे लवकरच आणखी एक ब्लॅक रिपब्लिक होईल' अशी काळजी चर्चिल यांनी १८९६ साली व्यक्त केली होती. हैती या देशाने अनेक वर्षांपासून सुरु असलेली गुलामगिरीची प्रथा नष्ट करत स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याचा संदर्भ देत 'क्यूबा लवकरच ब्लॅक रिपब्लिक होईल' असे चर्चिल यांनी म्हंटले होते.

दक्षिण आफ्रिका - बोअरच्या युद्धात ब्रिटीशांनी बनवलेल्या खास कॅम्पमध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या हजारो नागरिकांचा उपासमार आणि रोगराईमुळे मृत्यू झाला. या खास कॅम्पची चर्चिल यांनी नेहमी पाठराखण केली. दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय नागरिकंचा मताधिकार काढण्याचे विधेयक १९०६ मध्ये संमत करण्यात आले. याचे बीजारोपण चर्चिल यांनीच केले होते.

आयर्लंड - स्वतंत्र आयर्लंडच्या मागणीलाही चर्चिल यांचा विरोध होता. 'कोर्क पार्क हत्याकांड' आणि ब्लडी संडे' हे स्वतंत्र आयर्लंडच्या मागणीला चर्चील यांचे उत्तर होते.

सौदी अरेबिया - सौदी अरेबियातील वहाबीझमचे पुरस्कर्ते म्हणजे इब्न सौद. अमेरिकेतील 9/11 सह जगातील अनेक दहशतवादी कारवायात वहाबीझमच्या अतिरेक्यांचा समावेश आहे. वहाबीझमचे पुरस्कर्ते सौद यांच्या अनुयायांचा चर्चिल यांना भलता पुळका होता. सौद यांचे अनुयायी हे श्रद्धावान आहेत. या अनुयायांना आपल्या विरोधकांना ठार मारण्याचा तसेच त्यांच्या बायका आणि मुलांना गुलाम करण्याचा अधिकार आहे,' अशी त्यांची समजूत होती.

इराक - इराकमधील मागास जमातींमध्ये दहशत निर्माण व्हावी म्हणून त्यांच्यावर रासायनिक अस्रांचा प्रयोग करण्यास चर्चिल यांची संमती होती. अरबांविरुद्धही घातक बॉम्ब वापरावे असे त्यांचे मत होते.

पॅलेस्टाईन - चर्चिल यांनी पॅलेस्टाईन नागरिकांची सतत हेटाळणी केली. ज्यूंच्या चळवळीला त्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चर्चिल यांचा जेरुसलेमध्ये पुतळा उभारण्यात आला आहे.

केनिया - केनियातील डोंगराळ प्रदेशातल्या सुपीक जमिनी या केवळ श्वेतवर्णींच्या असतील असा निर्णय चर्चिल यांनी घेतला होता. त्यांनी हजारो केनियन नागरिकांची 'खास कॅम्प'मध्ये रवानगी केली. त्यामध्ये या नागरिकांवर प्रचंड अत्याचार करण्यात आले.

अफगाणिस्तान - अफगाण नागरिकांच्या विरुद्धही रासायनिक अस्त्रांचा वापर करण्यास चर्चिल यांची संमती होती. पश्तून नागरिकांना कोणता वंश श्रेष्ठ आहे हे समजण्यासाठी कठोर पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे त्यांना वाटत होते.

पॅलेस्टाईल रॉयल कमिशनसमोर १९३७ साली दिलेल्या साक्षीमध्ये चर्चिल म्हणतात, रेड इंडियन्स किंवा ऑस्ट्रेलियातील कृष्णवर्णीयांवर अन्याय झाल्याचे मला मान्य नाही. या लोकांची जागा श्रेष्ठ वंशाच्या शक्तीशाली लोकांनी घेतली आहे, यामध्ये काहीही चुकीचे नाही'.

चर्चिल यांच्या मते, 'श्वेत प्रोटेस्टंट ख्रिश्चन हे श्वेत कॅथलिकांपेक्षा आणि भारतीय हे आफ्रिकन्सपेक्षा श्रेष्ठ होते'. डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताुसार ब्रिटन सर्वश्रेष्ठ असल्याची त्यांची धारणा होती.

नाझीवाद आणि चर्चिल

हिटलरच्या नाझीवादापासून जगाचे, लोकशाही मुल्यांचे रक्षण करणारा नेता अशी चर्चिल यांची ओळख आहे. मात्र ब्रिटीश साम्राज्याचे हिटलरपासून रक्षण करणे इतकेच चर्चिल यांचे ध्येय होते. दुसरे महायुद्ध सुरु असताना ग्रीसमधल्या नाझीवादी गटाला चर्चिल यांच्या आदेशानंतरच ब्रिटीश सैन्याने मदत केली होती. ग्रीसमधल्या नाझीवादी गटाला चर्चिल यांचा उघड पाठिंबा होता.

दुसऱ्या महायुद्धात मोठे नुकसान होऊनही स्टॅलिन यांच्या रशियाने जर्मन सैन्याचा ब्रिटीश सैन्यापेक्षा अधिक पडाव केला. युरोपीयन देशांची हिटलरच्या तावडीतून सुटका केली. चर्चिल हे अमेरिकेच्याच मदतीवर विसंबून होते. अमेरिकेने वेळीच युद्धात भाग घेतला आणि ब्रिटनची सुटका केली. 'ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधी मावळत नव्हता' अशा ब्रिटनला अमेरिकेच्या दावणीला जुंपण्याची प्रक्रिया चर्चिल यांच्या राजवटीमध्येच सुरु झाली.

ब्रिटीश साम्राज्याची अखेर

चर्चिल यांच्या साम्राज्यवादी आणि वंशवादी/वर्णद्वेष्ट्या धोरणांमुळे ब्रिटीश वसाहतींच्या देशात स्वातंत्र्य चळवळीनी अधिक वेग घेतला. त्यानंतरच्या काही वर्षात यापैकी बरेच देश स्वतंत्र झाले. जागतिक महासत्ता म्हणून ब्रिटनचे असलेले महत्त्व चर्चिल काळातच संपले. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या दोन जागतिक महासत्तांचा उदय झाला.

थोडक्यात विन्स्टन चर्चिल हे जागतिक राजकारणातील वादग्रस्त नेते आहेत. त्याचबरोबर संपूर्ण जगासाठी आणि अगदी ब्रिटनसाठी देखील त्यांची धोरणे वादग्रस्त ठरली. बंगाल दुष्काळाच्या हातळणीबद्दल एक भारतीय म्हणून मी त्यांना कधीही माफ करणार नाही.

संदर्भ

१) The 10 greatest controversies of Winston Churchill's career

२) In Pragati: Book Review - Churchill's Secret War by Madhusree Mukherjee - varnam

३) Winston Churchill sculpture unveiled in Jerusalem

४) Winston Churchill - Wikipedia

५) Athens 1944: Britain’s dirty secret

५) Later life of Winston Churchill - Wikipedia

सर्व इमेज सौजन्य - गूगल

या प्रश्नासाठी दुसरे 1 उत्तर पहा