ओंकार डंके साठी प्रोफाइल फोटो

लडाखमधील गलवान भागात भारत - चीन सैन्यात चकमक झाली आणि या चकमकीत २० भारतीय जवान हुतात्मा झाले. त्याचबरोबर चीनचे ४३ सैनिक मारले गेले किंवा गंभीर जखमी झाले. मागील महिन्याभरापासून गलवान भागात भारत - चीन या दोन देशात तणाव वाढला होता. या तणावाचे रुपांतर या सैन्य चकमकीत झाले. १९७५ नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची मोठी चकमक भारत- चीन यांच्यात झाली आहे.

नेमकं काय झालं?

ही घटना घडल्यानंतर सोशल मीडिया आणि मेनस्ट्रीम मीडियावरील या विषयावरची वेगवेगळी माहिती वाचतोय. काही तज्ज्ञ व्यक्तींचे मत टीव्हीवर आणि यूट्यूबवरही पाहिले. त्यामधून गलवानमध्ये नेमके काय झाले याचा अंदाज येतोय….

गलवान खोऱ्यातील पीपी १४ हे भारतीय ठाणे चिनी सैनिकांनी बळकावले होते. भारत - चीन यांच्यात ६ जून रोजी झालेल्या चर्चेनंतर चिनी सैन्यानी हे ठाणे सोडले. त्यानंतर भारतीय सैन्याची तुकडी या ठाण्याचा ताबा घेण्यासाठी आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाली. चिनी सैनिकांना माघार घेणे मान्य नव्हतं. त्यामुळे १५ जून २०२० रोजी संतपाने धुमसत असलेल्या चिनी सैन्याने अचानक भारतीय सैन्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याला भारतीय जवनांनी जोरदार उत्तर दिले. दोन्ही सैन्यात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये बंदुकीचा वापर झाला नाही, असे वेगवेगळे तज्ज्ञ सांगतायत. मात्र लोखंडी रॉड, दगड तसेच अन्य अणुकूचिदार अस्त्राच्या साह्याने चिनी सैनिकांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे.

चीन का बिथरला ?

कोरोना व्हायरसचा उद्रेक होण्यापूर्वी भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर शांतता होती. दोन्ही देशांमधील शिष्टमंडळात वेगवेगळ्या पातळीवर चर्चाही होत होती. हे सर्व सुरु असताना चीन अचानक का बिथरला? मागील सहा महिन्यात चीन आक्रमक का झाला? भारतीय लष्करावर चीनने इतका मोठा हल्ला का केला? हे तपासले पाहिजे.

कोरोना व्हायरसचा उगम चीनमधल्या वूहान शहरात झाला. या व्हायरसबाबतची माहिती जगापासून चीनने लपवली. त्यामुळे जगभर याचा फैलाव झाला. जगभरात लाखो नागरिक यामध्ये मरण पावले. सर्वच देशांचं मोठं आर्थिक नुकसान झाले. हे सर्व आता उघड झाले आहे.

फक्त कोरोना व्हायरस नाही तर मागील २० वर्षात अशा प्रकारचे वेगवेगळे व्हायरस चीनमधूनच जगभर पसरलेत. कोरोना व्हायरस हा यामधील आजवरचा सर्वात संहराक व्हायरस. त्यामुळे अमेरिका पासून ऑस्ट्रेलिया व्हाया युरोपीयन देशात चीनची प्रतिमा खालावलीय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर कोरोना व्हायरसला 'चायनीज व्हायरस' असेही म्हंटले आहे. या प्रकरणात चीनवर कारवाईची भाषाही ट्रम्प यांनी बोलून दाखवलीय.

आता ही कारवाई किती होईल? कशा प्रकारे होईल? हे पुढचे मुद्दे असले तरी यामुळे चीनच्या या जागतिक प्रतिमेला मोठा धक्का बसलाय. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या चीनमधून गुंतवणूक काढून दुसऱ्या देशांमध्ये गुंतवणूक करत आहेत. ज्यात चीनचा आशिया खंडातील प्रतिस्पर्धी भारताचाही समावेश आहे. कोरोना व्हायरसचा फटका बसलेली चीनी अर्थव्यवस्था विदेशी गुंतवणूकही देशाच्या बाहेर गेली तर आणखी गाळात जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हाँगकाँग, तैवान या देशांबदल्लचे चीनची दडपशाहीची जगात मोठ्या प्रमाणात चर्चा होतीय. त्याचा फटका जगातील सुपर पॉवर होण्याच्या चीनच्या महत्त्वकांक्षेला बसणार आहे.

म्हणून चीन आक्रमक…

अंतर्गत प्रश्नावरुन नागरिकांचे लक्ष वळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेवर काही तरी कुरापती करणे हे जगातील सर्व हुकुमशाही राजवटीचे समान लक्षण आहे. चीनचा इतिहास पाहिला तर चीनमध्ये साम्यवादी राजवट आल्यानंतर देशाची घडी बसण्यापूर्वी लगेच १९५० साली चीनचे सैन्य साम्यवादी उत्तर कोरियाच्या बाजूने कोरियन युद्धात उतरले होते. माओंच्या 'लांब उडी' मारण्याच्या मोहिमेला अपयश येऊ लागताच चीनने १९५९ साली तिबेट बळकावला. १९६२ साली भारतासोबत युद्ध केले. त्यांची ताजी दगाबाजी देखील चीन अडचणीत सापडल्याचे उदाहरण आहे.

१९६२ चा भारत नाही

भारत - चीनचा विषय निघाला की १९६२ च्या आठवणीने अनेक भारतीय चार पावलं मागे सरकतात. १९६२ आणि २०२० चा भारत यामध्ये मोठा फरक आहे. १९६२ चे युद्धात आपले काय चुकले याचे विश्लेषण करणारे अनेक साहित्य आता उपलब्ध आहे. या विषयावरचे 'न सांगण्याजोगी गोष्ट : ६२ च्या पराभवाची शोकांतिका' हे मेजर जनरल शशिकान्त पित्रे ( निवृत्त) यांचे पुस्तक तरी आपण किमान वाचावे अशी मी सर्वांना विनंती करेन. हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला १९६२ चा भारत आणि सध्याचा भारत यामधील फरक कळेल.

भारत सरकारने २०१४ च्या नंतर भारत - चीन सीमेवर मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या भागात पूर्वी जायला काही दिवस लागत तिथे आता आपले सैन्य उत्तम रस्त्यांमुळे काही तासांमध्ये पोहचू शकते. अगदी कोरोना व्हायरसच्या काळातही या भागातील काम सुरुच आहे. अगदी काही दिवसांपूर्वी म्हणजे १३ जून रोजी झारखंडमधील मजुरांची एक तुकडी या कामावर रवाना झाल्याची बातमी मी ABP न्यूजवर पाहिली होती.

भारत - चीन सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरु असलेली विकासकामं, कैलास यात्रेसाठी उत्तराखंडमधून बांधलेला नवा रस्ता, चीनच्या सैनिकांच्या बरोबरीने भारतीय लष्कर आणि सर्व प्रकारच्या शस्त्रांची तैनाती हे सर्व चीनला दिसतंय. त्यामुळेच चीन अधिक आक्रमक होत भारताच्या कुरापती काढतोय.

भारताचे शेजारी काय करतील?

भारताच्या सर्व शेजाऱ्यांभोवती चीनने गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून जाळे विणले आहे. पाकिस्तान तर पूर्वीपासूनच चीनचा मित्र. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदिव या देशातही चीननं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलीय. नेपाळ हल्ली जो बिथरलाय त्यामागे चीनचीच फुस आहे.

भारत सरकारही शांतपणे गेल्या काही वर्षात चीनच्या चालींना उत्तर देतंय. भारताने श्रीलंकेत गुंतवणूक करत श्रीलंका चीनची मांडलिक होणार नाही याची काळजी घेतलीय. जपान,ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम या देशांशी भारताने लष्करी आणि आर्थिक करार केले आहेत. अमेरिकेसमोबतही भारतीय नौदलाने सराव केलाय. जी - ७ चा आंतरराष्ट्रीय संघटनेचा विस्तार करुन त्यात भारताला सहभागी करुन घ्यावं असा अमेरिकेचाच प्रस्ताव आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे नेतेपद भारताकडे आहे. कोरोना व्हायरसमधील चीनच्या भूमिकेची चौकशीची मागणी आता जोर धरतीय. भविष्यात चौकशी झाली आणि त्या चौकशीला सहकार्य केलं तरी पंचाईत आणि केले नाही तरी बदनामी अशी 'धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय' अशी चीनची अवस्था झालीय. इराणच्या चाबहार बंदरात भारताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलीय. त्यामुळे पाकिस्तान आणि पर्शियन आखातामध्ये भारतीय लष्कराला वेगाने हलचाली करणे शक्य होईल.

चीनचे शेजारी तरी कुठे चीनचे मित्र आहेत? उत्तर कोरिया आणि अलिकडच्या काळात फिलिपाईन्स सोडले तर चीनचे जवळपास सर्व शेजारी देशांशी वाद आहेत. चीन भारताची शेजारी देशांच्यामार्फत कोंडी करतोय या प्रचारावर विश्वास ठेवताना भविष्यात युद्ध झालं तर भारतही चीन विरुद्ध दुसरी आघाडी उघडू शकतो या शक्यतेचाही आपण विचार करायला हवा. आपण केला नाही तरी चीन सरकार या शक्यतेचा विचार करत असणार हे नक्की.

थोडक्यात सारांश

भारत हा गौतम बुद्ध आणि महात्मा गांधीचा देश आहे. भारतने आजवर कोणत्याही देशावर युद्ध लादलेले नाही. कधीही कुणावर आक्रमण केलेले नाही. भारताची चीनबाबतही आगामी काळात हीच भूमिका असेल. चीनलाही भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची आणि भारतीय सरकारच्या दृढनिश्चयाची कल्पना आहे. तसेच गलवानमधील चकमकीतही चीनचे हात पोळलेत. त्यामुळे चीन निर्णायक युद्ध सुरु करण्यापूर्वी दहादा विचार करेल.

चीनने युद्धाचे आत्मघातकी पाऊल उचललेच तर भारताचे यात मोठे नुकसान होईल पण कम्युनिस्ट चीनच्या शेवटाची ती सुरुवात असेल.

सर्व इमेज सौजन्य - गूगल

टीप - भारत - चीन प्रश्नावरील माझे अन्य उत्तर वाचा - वास्तविक नियंत्रण रेषेवरून (एलएसी) भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावावर 1962 च्या युद्धानंतर, एकत्रितपणे तोडगा का काढला गेला नसावा?

या प्रश्नासाठी 2 इतर उत्तरे पहा