तुकोबा म्हणतात मनुष्याने सदैव नम्र असावे किंबहुना लीनपणाने वागले असता त्याच्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच मनुष्याने अंगी नम्रपणा बाणला असता त्याचे आयुष्य कसे आनंददायी आणि सुखकर होते परंतु तोच व्यर्थ थोरपणा मिरविला तर ते कसे कष्टदायी होऊन तेच पुढे कसे मग नरकाची वाट देखील दाखवते हे पुढील सर्व अभंगांतून स्पष्ट होईल...
🌷🌷
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।
ज्याचे अंगी मोठेपणा । तया यातना कठीण ।।
तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहूनि लहान ।।
तुकाराम महाराज देवाला विनंती करतात की हे देवा पांडुरंगा, मला ह्या संसारात जो सर्वात लहान आहे त्याच्यापेक्षाही लहान बनव, तू मला लहानपण दे म्हणजेच कमीपणा दे. ते म्हणतात कारण अशा ह्या संसारात जी मुंगी आहे जी येथे आकारानेही लहान असून तिच्या अस्तित्वाचीदेखील कोणी मनी दखल घेत नाही, तीच येथे सुखी असून खाण्यासदेखील तिला रोज साखरेचा रवा मिळतो. परंतु तेच उलट्या बाजूला ऐरावत हत्ती जो समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी एक आहे, त्याचे मोठेपण, थोरपण पाहून इंद्राने त्याला स्वतःसाठी मागून घेतले आणि स्वताचे वाहन बनवले. परंतु अशाने फक्त ऐरावताच्या नशिबी रोज माहूत्याचा(त्याच्यावर अंकुश ठेवणाऱ्याचा) मारच येऊ लागला व तो त्याला निमूटपणे सहनदेखील करावा लागला.
ते पुढे म्हणतात ह्यावरून एकच सिद्ध होते की जो कोणी येथे मोठेपण मिरवतो, स्वतःचे थोरपण मिरवतो आणि वर ते लोकांच्या नजरेत भरून यावे अशी मनी इच्छा बाळगतो ते मग शेवटी लोकांच्या डोळ्यात खरोखरच भरते. परंतु त्यापासून त्याला फायदा होण्याऐवजी उलट त्याचे नुकसानच अधिक होते. ते म्हणतात अशांपासून त्याला यातना मिळण्यास सुरुवात होते, त्याची 'वाहवा' होण्याऐवजी त्याच्या पदरी कष्टच अधिक पडतात. परंतु त्याउलट दुसरीकडे जो नम्र आहे, लहानाहूनि लहान आहे किंबहुना लीनाहूनही लीन झाला आहे त्याच्या नशिबी मात्र आगळेच सुख येते, लोक त्याच्या वाट्याला जातदेखील नाहीत, त्याला त्रास द्यायचे तर त्यांच्या ध्यानी-मनीसुद्धा येत नाही आणि शेवटी साखरेसारखा मावाच त्याच्या नशिबी येतो.
तुकोबाराय शेवटी लोकांना उद्देशून म्हणतात की म्हणून तुम्हीदेखील हे वर्म आता सर्वार्थाने लक्षात घ्या, तुम्ही हे रहस्य, हे गुपित ध्यानात ठेवून जितके लहानाहून लहान बनता येईल तितके व्हा. कारण त्याने तुमच्या नशिबी, तुमच्या पदरी जे सर्वोत्तम आहे तेच येईल किंवा तेच पडेल.
अभंग ७४४
🚩🚩ते म्हणतात स्वतःकडे कमीपणा किंवा नम्रपणा घेतला असता मोठमोठ्या संकटांना देखील मग तोंड देता येते आणि त्यातून सहीसलामत सुटता देखील येते...
नीचपण बरवे देवा । न चले कोणाचाही दावा (हेवा) ।।
महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे राहाती (वाचती) ।।
येतां सिंधूच्या लहरी । नम्र होता जाती वरी ।।
तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ।।
तुकाराम महाराज म्हणतात नीचपण म्हणजे कमीपणा, नम्रपणा किंवा नम्रभाव केव्हाही चांगला कारण अशा स्थितीत कोणीही मग वैरही धरत नाही आणि हेवाही करत नाही.(म्हणजेच अंगी नम्रपणा धरल्याने मग कोणालाही येथे सुखाने जगता येते.)
ते म्हणतात जेव्हा महापूर येतो तेव्हा मोठमोठी झाडे त्यात गळून पडतात, वाहून जातात परंतु त्याच महापुरात नम्र होऊन वाकणारी लव्हाळे मात्र तग धरून राहतात. तसेच सागरात जेव्हा मोठमोठ्या लाटा येतात किंवा प्रचंड लाटा उसळतात तेव्हा त्या प्रवाहांबरोबर वाहणारा (म्हणजेच नम्र होऊन त्यांना शरण जाणारा) आपोआपच तरला आणि तारला जातो. ते म्हणतात अशांना समुद्राच्या लाटा मग काहीही करत नाही उलट ते त्यांच्यावरून निघून जातात परंतु त्यास विरोध करणारा मात्र स्वतःचे प्राण गमावतो.
तुकोबाराय शेवटी म्हणतात म्हणूनच मनुष्याने नेहमी अंगी नम्रपणा बाणला पाहिजे कारण त्याचे सर्वांगाने फायदे आहेत आणि अचाट शक्तींपुढे तर नम्र होऊनच वागले पाहिजे, कारण त्यांना जर नतमस्तक झालो तर तेही मग स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवतात आणि शरण आलेल्यांवर स्वतःच्या बळाचा वापर करत नाहीत किंबहुना तो मग आपोआपच होत नाही.
अभंग ७४५
🚩🚩म्हणून ते स्वतः देवाकडे देखील तेच मागतात किंवा त्याचाच हट्ट धरतात ज्याने संपूर्ण आयुष्याचेच कल्याण होईल...
इतुलें करी देवा ऐके हे वचन । समूळ अभिमान जाळी माझा ।।
इतुलें करी देवा ऐके हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखे ।।
इतुलें करी देवा विनवितो तुज । संतचरण रज वंदी माथा ।।
इतुलें करी देवा ऐके हे मात । हृदयी पंढरीनाथ दिवसरात्री ।।
भलतिया भावे तारी पंढरीनाथा । तुका म्हणे आता शरण आलो ।।
तुकाराम महाराज पांडुरंगाला उद्देशून म्हणतात की हे देवा नारायणा आता फक्त एवढेच कर की जेणेकरून माझ्याठायी असलेला अभिमान समूळ नष्ट होईल किंबहुना तो समूळ जाळूनच टाक. ते म्हणतात हे देवा माझी एक एवढीशी गोष्ट ऐकून घे आणि माझी दृष्टी सर्वांच्याप्रति एकसमानच राहील असे कर आणि अशा त्या झालेल्या समदृष्टीने मग मी तुलाच सर्वत्र आणि सर्वांच्यात पाहीन असे कर.
ते पुढे म्हणतात हे नारायणा अजून एक माझी एवढीशी विनंती मान्य कर की संतचरणांची धूळ मला माथी लावायची संधी मिळू दे, मला तो भाग्याचा दिवस दिसेल असे कर. तसेच माझ्या हृदयात आणि ध्यानीमनी किंबहुना दिवस-रात्र सतत हे पंढरीनाथ तूच वास करशील ही अजून एक एवढीशी गोष्टदेखील तू पूर्ण कर.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की हे देवा पंढरीनाथा आणि अजून एक इवलीशी माझी इच्छा पूर्ण कर आणि ती म्हणजे कोणत्याही भावनेने का होईना तू माझा उद्धार कर. म्हणजेच मला तू तुझा भक्त मान किंवा नको मानुस, मला ब्रह्मज्ञान झाले आहे की नाही हेदेखील नको पाहूस, मी दयेसाठी योग्य आहे की काही हे देखील लक्षात नको घेऊस, म्हणजेच केवळ मी तुला शरण आलो आहे हे आणि एवढेच लक्षात घेऊन तू माझ्यावर कृपा कर आणि एकदाचा काय तो माझा उद्धार कर.
अभंग ३३०५
🚩🚩ते पुढे म्हणतात येथे ह्या भूतलावर असे एक जर कोणते स्थान असेल जेथे क्षणात अभिमान जातो किंवा तो समूळ नष्ट होतो ते म्हणजे पंढरी...
उठाउठी अभिमान । जाय ऐसे स्थळ कोण ।।
ते या पंढरीस घडे । खळा पाझर रोकडे ।।
नेत्री अश्रूंचिया धारा । कोठे रोमांच शरीरा ।।
तुका म्हणे काला । कोठे अभेद देखिला ।।
तुकाराम महाराज म्हणतात पुरुषाच्या अंतरीचा अभिमान त्वरित नष्ट होईल असे या भूतलावर जर कोणते स्थळ आहे, कोणते एकमेव जर ठिकाण असेल तर ते म्हणजे पंढरी म्हणजेच भूतलावरील वैकुंठ. ते म्हणतात अशक्यप्राय गोष्टी तेथे शक्य होतात. तेथे पुरुषाचा अहंकार क्षणात गळून पडतो आणि एवढेच नव्हे तर त्याच्या दगडरुपी मनाला पाझर फुटतो. तसेच विटेवर युगानुयुगे उभ्या असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घडताच त्याच्या डोळ्यातुन चक्क अश्रूधारा वाहू लागतात आणि श्रीमुख पाहताच त्याच्या शरीरावर आनंदाने रोमांच उभे राहतात.
तुकोबाराय शेवटी म्हणतात अशाप्रकारे जीव आणि शिवाची एकाक्षणात जर कोठे गाठ घडून येत असेल तर ती पंढरी असून भक्त आणि देव एकमेकांत असेकाही मिसळतात जणूकाही कालाच (म्हणजेच दहीकाल्याचा काला.) ते विचारतात भक्त आणि श्री हरी नारायण ह्यांच्यातील भेद त्वरित नाहीसा होऊन अशाप्रकारे ते एकरूप होताना पाहणे किंवा असे ते दृश्य तुम्ही इतरत्र कोठे पाहिले आहेत का?
अभंग १०३४
🚩🚩जेव्हा संतजनांत तुकोबांची स्तुती होऊ लागते तेव्हा अशा ह्या स्तुतीने आपल्याठायी अभिमान वाढू लागेल किंवा तशी शक्यता निर्माण होईल अशी त्यांना भीती वाटते आणि म्हणून ते संतांनादेखील विनवितात की...
न करावी स्तुति माझी संतजनी । होईल या वचनी अभिमान ।।
भारे भवनदी नुतरवे पार । दुरवती दूर तुमचे पाय ।।
तुका म्हणे गर्व पुरवील पाठी । होईल माझ्या तुटी विठोबाची ।।
तुकाराम महाराज म्हणतात संतजन आपण कृपा करून माझी स्तुति करू नये, कारण तुमच्या वचनांनी माझ्यात संतत्वाचा अभिमान निर्माण होईल, माझ्या अंगी व्यर्थ थोरपणा येईल आणि अशा ह्या अभिमानाच्या भाराने/ओझ्याने मी भवनदी पार करू शकणार नाही आणि मुख्य म्हणजे त्यामुळे मला तुमचे आणि पर्यायाने विठोबाचे पाय दुरावतील.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की आणि हा गर्व मला असा काही चिकटेल की पुढे जाऊन तो माझी पाठच सोडणार नाही व त्यामुळे मग विपरीतच घडून येईल, म्हणजेच अशा ह्या थोरपणामुळे माझी माझ्या विठोबाशी ताटातूट होईल आणि तो मला संपूर्णपणे अंतरेल.
अभंग ६२२
🚩🚩तुकाराम महाराजांची ख्याती दिवसेंदिवस वाढत होती किंबहुना वाढतच गेली आणि लोकांनी त्यांना थोरपणा देऊ केला तेव्हा अशा वेळी आपल्या विठ्ठलाचे आपल्याकडून विस्मरण होते कि काय, प्रसिद्धीमुळे अहंकार बळावून आपल्याला कधी विठ्ठलाचा विसर तर नाही पडणार ना याची त्यांना नेहमी भीती असे, तेच त्यांनी पुढील अभंगातून कथन केले आहे.
सर्व काळ डोळा बैसो नारायण । न यो अभिमान आड पुढे ।।
धाड पडो माझ्या थोरपणावरि । वाचे हरिहरि उच्चारीन ।।
जळो अंतरीचे सर्व जाणपण । विवादवचन अहंतेचे ।।
सकळा चरणी गळीत माझा जीव । तुका म्हणे भाव एकविध ।।
तुकाराम महाराज म्हणतात मला आणि माझ्या डोळ्यांना नित्य आणि सदासर्वकाळ आता फक्त नारायणच दिसू देत आणि माझ्या आणि त्याच्यात माझा हा ज्ञानीपणाचा अभिमान, हा जाणतेपणाचा अहंकार आड नको येऊ देत एवढीच माझी इच्छा आहे एवढेच माझे मागणे आहे.
ते पुढे म्हणतात अशा ह्या माझ्या थोरपणावर आता धाडच पडूदेत जो फक्त आणि फक्त माझ्या हानीलाच कारणीभूत ठरू शकतो किंबहुना माझ्या ह्या थोरपणाला आगच लागूदेत आणि माझ्या मुखी सतत श्री हरीचेच नाव येऊ देत. तसेच मला प्राप्त झालेल्या सर्व विद्येचे आणि त्यातून आलेल्या जाणपणाचे, आणि वर त्यातून उद्भवत असलेल्या विवादाचे आणि विवादात सरस ठरल्यामुळे वाढीस लागलेल्या अहंतेचे कंबरडेच एकदाचे मोडू देत किंबहुना सर्वकाही एकदाचे जळून खाक होऊ देत.
तुकोबाराय शेवटी म्हणतात हे देवा नारायणा, मी येथील सर्व भूतमात्रांमध्ये किंबहुना सर्व जीवांमध्ये तुला एकालाच पाहीन असे कर आणि त्याच एकविध भावाने म्हणजेच कायावाचामनाने त्यांच्या चरणी माझा जीव नम्र होउन राहूदेत किंबहुना तो त्यांच्या पायी सदैव लीनच होऊन राहील असे कर.
अभंग २९९७
🚩🚩तुकोबा म्हणतात उच्च जातीत जन्म घेतल्याने देखील जातीचा अभिमान पाठी लागतो आणि म्हणून आपल्याला हीन जातीत जन्म दिल्यासाठी ते देवाचे आभारच मानतात...
बरा देवा कुणबी केलो । नाही तरी दंभे असतो मेलो ।।
भले केले देवराया । नाचे तुका लागे पाया ।।
विद्या असती काही । तरी पडतो अपायी ।।
सेवा चुकतो संतांची । हेची नागवण फुकाची ।।
गर्व होता ताठा । जातो यमपंथे वाटा ।।
तुका म्हणे थोरपणे । नरक होती अभिमाने ।।
तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले देवा मला तू कुणबी केलेस आणि खालच्या जातीत जन्माला घातलेस नाहीतर जर उच्चकुळात जन्माला आलो असतो तर उगीच अभिमानाने आणि त्यापायी दंभाने मेलो असतो. ते देवाला म्हणतात खरेच हे देवा तू भले केलेस कारण आज मी नम्र होऊन सर्वांच्या पाया पडू शकतो आणि आनंदाने नाचू शकतो.
तसेच ते म्हणतात जर माझ्याजवळ एखादी विद्या किंवा कला असती तर त्याचा मला अपायच झाला असता. त्याच्यामुळे माझ्याहातून संतसेवा घडली नसती आणि माझ्या नरदेहाची तर व्यर्थ नागवण झाली असती, म्हणजे माझे आयुष्य उगीच वाया गेले असते.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की माझ्या अंगी जर गर्व किंवा ताठा आला असता तर माझ्या हातून पापे घडून मी यमपंथाला गेलो असतो, नरकाच्या वाटेला लागलो असतो. कारण ते म्हणतात मोठेपणाच्या किंवा थोरपणाच्या अभिमानाने अनेकजण शेवटी नरकातच जातात, तेथेच त्यांना मानाचे स्थान मिळते.
अभंग १७८
🚩🚩ते म्हणतात विष्णूच्या सर्व दासांठायी किंवा सर्व हरिभक्तांठायी अभिमान नावाला देखील नसतो, किंबहुना भोळेपणाव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा भाव शोधूनही सापडत नाही आणि म्हणून ते नेहमी सुखाने आणि समाधानाने भरून असतात...
लवविले तया सवे लवेजती । अभिमान हाती सापडेना ।।
भोळीवेचे लेणे विष्णुदासा साजे । तेथे भाव दुजे हारपती ।।
अर्चन वंदन नवविधा भक्ती । दया क्षमा शांती तये ठायी ।।
तये गावी नाही दुःखाची वसती । अवघाचि भूती नारायण ।।
अवघेचि झाले सोवळे ब्रह्माण्ड । विटाळाचे तोंड न देखती ।।
तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा । याही भूमंडळामाजी कीर्ती ।।
तुकाराम महाराज म्हणतात की येथे जे लोक विष्णुदासांना लवून वंदन करतात, त्यांना झुकून अभिवादन करतात त्यांच्यासोबत हे वैष्णवदेखील मग झुकून त्यांना वंदन करतात, त्यांच्या पाया पडणाऱ्यांच्यादेखील ते पुन्हा पाया पडतात. ते म्हणतात असे हे श्री हरीचे दास असून ते कधीही अभिमानाच्या हाती सापडत नाही, कधीही ते अहंकाराने व गर्वाने फुलून जात नाहीत. उलट त्यांच्याठायी असलेला भोळेपणाच त्यांना अतिशय शोभून दिसतो किंबहुना ह्याच भोळिवेचे लेणे/अलंकार ते नेहमी अंगावर परिधान करून असतात व त्यांच्याठायी असलेले इतर कामक्रोधादि सर्व भाव केव्हाच हरपलेले असतात.
ते म्हणतात अशा ह्या विष्णुदासांच्याठायी, त्यांच्या अंगी दया, क्षमा, शांती हे संतांचे तीन मुख्य गुण असून अर्चन, वंदन आदी नवविधा भक्तींनी ते श्री हरीची भक्ती करतात. त्यामुळे त्यांच्या गावी कधीही दुःखाला वस्ती नसते किंबहुना दुःख म्हणजे काय त्यांना ठाऊकच नसते. उलट असे हे विष्णूदास नेहमीच सर्व भूतमात्रांमध्ये नारायणालाच पाहतात आणि अशारितीने अवघ्या ब्रह्माण्डाच्याच ठायी त्यांना नारायण दिसत असल्याने हे सर्व ब्रह्माण्डच त्यांच्यासाठी सोवळे होऊन जाते, तेथे ओवळे किंवा विटाळ असे त्यांना कधी शोधूनही सापडत नाही.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की अशा ह्या वैष्णवांचा, ह्या विष्णुदासांचा, त्यांच्या कीर्तीचा वैकुंठात देखील सोहळा साजरा होत असतो व ह्या भूमंडळात म्हणजेच ह्या भूतलावर देखील त्यांची कीर्ती सदैव दरवळत असते.
नवविधा भक्ती :-भक्तीचे नऊ प्रकार असून ते पुढीलप्रमाणे आहेत.
श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य(मैत्री) आणि आत्मनिवेदन(आत्मसमर्पण).
अभंग १५९८
🚩🚩म्हणूनच ते देवाला कळकळीची विनंती करतात की...
नको मज ताठा नको अभिमान । तुजवीण क्षीण होतो जीव ।।
दुर्धर हे माया न होय सुटका । वैकुंठनायका सोडवी मज ।।
तुका म्हणे तुझे झालिया दर्शन । मग निवारण होईल सर्व ।।
तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा, हे नारायणा मला चुकूनही गर्व, ताठा किंवा अभिमान देऊ नकोस किंबहुना तो किंचितही माझ्याठायी उत्पन्न होईल असे करू नकोस कारण अशाने मग ह्या दुर्धर मायेतून माझी सुटका होणार नाही, मी पैलपार पावणार नाही.
ते म्हणतात किंबहुना माझा जीव फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच कासावीस आणि क्षीण होतो आहे त्यामुळे कृपा करून तू लवकरात लवकर ह्या संसारातून माझी सुटका कर.
तुकोबाराय शेवटी म्हणतात हे वैकुंठनायका, हे विठ्ठला एकदा का मला तुझे दर्शन घडले तर मग ह्या सर्वांतून म्हणजेच ह्या सर्व काम-क्रोध-मोह-मद-मत्सर-अहंकरादि विकारातून माझे खऱ्या अर्थाने निवारण होईल.
अभंग २५८१
🚩🚩तुकोबा शेवटी म्हणतात येथे जर कोणाची थोरी असेल तर ती त्या एका सर्वसत्ताधाऱ्याची आहे म्हणजेच येथे ह्या संसारात त्या एकाचीच थोरवी आहे ज्याची जेथे खरी सत्ता आहे...
माप म्हणे मी मविते । भरी धणी ठेवी रिते ।।
देवा अभिमान नको । माझे ठायी देऊ सको ।।
देशी चाले सिका । रिते कोण लेखी रंका ।।
हाती सूत्रदोरी । तुका म्हणे त्याची थोरी ।।
तुकाराम महाराज म्हणतात की 'माप' म्हणते मी धान्य मोजतो म्हणून मी श्रेष्ठ आहे, माझे मोठेपण खरे आहे परंतु पाहू गेले असता धान्य भरणारा मालक त्यात धान्य भरतो आणि इतर वेळी ते माप रिकामे ठेवतो. तेव्हा ते म्हणतात असा अभिमान काय कामाचा जो क्षणिक असतो किंवा क्षणभंगुर असून एकाक्षणासाठीच टिकतो आणि मुख्य म्हणजे ज्यात त्याचे स्वतःचे असे काहीच कर्तृत्व नसते, म्हणून ते देवाला विनवितात की हे देवा माझ्याठायी देखील असा व्यर्थ अभिमान केव्हाही जागृत होऊ देऊ नकोस.
ते पुढे म्हणतात ज्याप्रमाणे ज्या देशात राहावे तेथे त्या देशाच्या किंवा राजाच्या नावाचा शिक्का चालतो, म्हणजेच त्या शिक्क्यावर जर राजाची मोहोर असेल तरच त्या शिक्क्याला मोल प्राप्त होते आणि तो ज्याच्या हाती असेल त्यालादेखील महत्व लाभते नाहीतर इतर लोकांच्या मते तो रंकच ठरतो आणि त्याला मग कोणी विचारत देखील नाही.
तुकोबाराय शेवटी म्हणतात आणि म्हणनूच ज्याच्या हाती सत्तेची दोरी असते तोच खरा मोठा असतो, तोच श्रेष्ठ असून बाकी इतर लोकांच्या खोट्या अभिमानाला येथे काडीचाही अर्थ नसतो.
अभंग ३१०
#TukaramGatha #Abhang #SantTukaram #VitthalBhakti #TukaMhane