हा अभंग देव आहे किंवा नाही ह्याच्याशी जोडलेला नसून त्याच्या स्वरूपाशी जोडलेला आहे, म्हणजेच तुकोबांनी देवाच्या स्वरूपाचे वर्णन ह्यात केलेले आहे आणि स्वरूपाचे वर्णन केले म्हंटल्यावर देवाचे अस्तित्व आलेच, परंतु सर्वात आधी देव आहे की नाही हे आकळण्यासाठी मायेच्या पल्याड पाहावे लागेल किंवा लागते आणि ते पाहण्यासाठी आधी मनी भाव हवा आणि भाव नुसता असून कामाचा नाही तर तो शुद्ध आणि भोळा असून वर उच्च कोटींचा असणे देखील तितकेच गरजेचे आहे, कारण असा भाव अंगी बाणल्यावरच मनुष्याला मग सर्वत्र ब्रह्म दिसावयास लागते किंवा सर्व सृष्टी आपोपाप ब्रह्ममय दिसू लागते.
ह्याचाच दुसरा अर्थ असा की येथे ज्ञान/आत्मज्ञान होण्यासाठी अध्यात्माविषयी वाचन किंवा त्याची पारायणे करण्याची गरज नाही, कारण त्याने बहुदा फक्त बुद्धीतच भर पडते आणि साधक पंडित किंवा शब्दज्ञानी होतो, देवाप्रती भाव बळकट होत नाही. म्हणजेच देवाप्रती भाव बळकट होण्यासाठी त्याच्याप्रती आधी दृढ विश्वास हवा, श्रद्धा हवी, तो अस्तित्वात आहे की नाही असा संदेह मनी असता कामा नये, उलट चराचरात त्याचा वास आहे एवढी गाढ श्रद्धा हवी आणि तसे जर असेल तर आणि तरच मनुष्याला मग खऱ्या अर्थानेच सर्व चराचरात तो दिसू लागतो किंबहुना तशी त्याला अनुभुतीच येऊ लागते आणि अशीच अनुभूती मग त्याला आत्मज्ञानाच्या / ब्रह्मप्राप्तीच्या समीप घेऊन जाते.
म्हणजेच ह्याच दृढ विश्वासाच्या मोबदल्यात देवाला भक्तास अंती ज्ञान द्यावे लागते आणि म्हणूनच संत नेहमी म्हणतात की बोध/आत्मबोध हा कधीही (नुसत्या पुस्तकी) ज्ञानाने होत नाही, तर तो भावानेच होतो, आणि असा हा बोध/ ज्ञान झाल्यावरच मग त्याला ज्ञानदृष्टी लाभते जेणेकरून मग त्याला जे सामान्यांना दिसत नाही ते दिसू लागते. (म्हणजेच आधी फक्त त्याची श्रद्धा असते की चराचरात देव आहे आणि तशी ती श्रद्धा, तो विश्वास तो कोणत्याही परिस्थिती ढळू देत नाही आणि म्हणूनच ती श्रद्धाच मग त्याला खऱ्या अनुभूतीकडे घेऊन जाते आणि त्यास खरोखरच सर्वत्र देव दिसू लागतो, म्हणजेच त्याला सर्व सृष्टी ब्रह्ममय दिसू लागते.)
असो.
आता त्याच ज्ञानाच्या बळावर तो देवाची वर म्हंटल्याप्रमाणे जेव्हा स्तुती करू लागतो किंवा त्याचे स्वरूप वर्णू लागतो तेव्हा त्यालाच त्याचे कळून येते की देवाचे स्वरूप हे तर शब्दातीत आहे, ते कितीही वर्णन करू गेले तरीही 'तो निश्चित असा आहे' असे सांगता येत नाही. म्हणजेच जे खुद्द वेदांनांही करता आले नाही ते देवाचे वर्णन आपण तरी कसे काय करू शकतो, त्यापेक्षा त्या भानगडीत न पडलेच बरे.
उदा. तुम्ही आत्म्याचे वर्णन वाचल्यावर तुम्हांला कळून येईल की त्यातदेखील 'आत्मा असा आहे किंवा असा नाही' हे सांगितले आहे, म्हणजेच तो उपाधिरहित आहे, त्याची मनुष्यासारखी वाढ होत नाही किंवा तो खुंटत नाही, त्याला जन्म-मृत्यू नाही, तो जेथीचा आहे तेथेच असतो, म्हणजेच तो हालचाल करत नाही, तो एकठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, तसेच तो स्वयंसिद्ध आहे, असे आणि बरेच काही.
परंतु जोपर्यंत त्याचा अनुभव होत नाही म्हणजेच 'तो नेमका कसा आहे' हे अनुभवल्याशिवाय जोवर कळत नाही तोवर सर्वसाधारण मनुष्याला ते आकळत नाही. म्हणेजच साखरेचे वर्णन गोड आहे असे जेव्हा आपण करतो तेव्हा ती जिव्हेने चाखल्यास 'गोड म्हणजे काय' हे जसे कळून येते येथे मात्र तसे नाही. म्हणजेच येथे नेमके तेच साधता येत नाही. कारण जे साधारण इंद्रियांनी अनुभवताच येत नाही ते आकळणार तरी कसे?
म्हणजेच मनुष्य जे काही अनुभवतो ते त्याच्या ज्ञानेंद्रियांमार्फत, परंतु देवाला मात्र साधारण इंद्रियांनी अनुभवता येत नाही, त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ठायी अधिकचे इंद्रिय लागते ज्यास 'अतींद्रिय' असं म्हणतात आणि जे फक्त आणि फक्त आत्मज्ञान झाल्यावरच प्राप्त होते, अन्यथा नाही.
माऊलींनी देखील ज्ञानेश्वरीत सांगितले आहे की ब्रह्मस्थिती ही अनिर्वाच्य आहे, शब्दातीत आहे आणि त्यामुळे ती साधारण इंद्रियांनी भोगणे किंवा तिचा अनुभव घेणे तर दूरचीच गोष्ट आहे, तरीदेखील तिची गोडी तुम्हांला चाखता यावी किंवा निदान अंशमात्र तरी कळावी यासाठी मी तीचे ज्ञानेश्वरीत असे काही निरूपण करिन, त्या अरुपाचे रूप, म्हणजेच त्या ब्रह्माचे रूप मी असे काही वर्णन करिन की ती तुम्हांला तुमच्याठायी असलेल्या साधारण इंद्रियांनी सुद्धा भोगता येईल.
आणि ज्यांनी कोणी कुंडलिनी जागृतीचे उत्तर वाचले असेल त्यात देखील खुद्द देवानेच सांगितले आहे की ज्या कोणाला सुदैवाने ही ब्रह्मस्थिती लाभते किंवा प्राप्त होते त्यांनीदेखील फक्त ती भोगावी, ती वर्णन करण्याच्या भानगडीत पडू नये आणि ते यासाठी नाही की ती कोणाला कळणार नाही, तर यासाठी की ती वर्णनच करता येत नाही.
*********************************************
🚩🚩आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की...
*********************************************
आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ।।
आवडी आवडी कळिवरा कळिवरी । वरिली अंतरी ताळा पडे ।।
अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ।।
तुका म्हणे एकें कळतें दुसरें । बरियानें बरें आहाचाचें आहाच ।।
*********************************************
तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या वाणीकडून 'देव असा आहे किंवा तसा आहे' असे वदविले जात असले तरीही मनाला काही तो तसाच्या तसा अनुभवतात येत नाही. म्हणजेच देवानेच माझ्या वाणीकडून 'देव असा आहे किंवा असा असतो किंवा असा नसतो' हे वदवून घेतले आहे परंतु 'मन' हे जे मनुष्याचे सहावे इंद्रीय आहे त्याला मात्र काही तसा अनुभव येताना दिसत नाही. (याचा अर्थ असा नाही की देव अस्तित्वात नाही किंवा तुकोबा नास्तिक आहेत, ह्याचा अर्थ असा की मन हे देवाला अनुवभवण्याच्या कामी अपुरे पडते.)
(म्हणजेच देवाला अनुभवण्यासाठी मन कामाचे नाही कारण 'देव' म्हणजेच दुसरे तिसरे कोणी नसून तोच ब्रह्म / परब्रह्म / आत्मा आहे आणि त्याचा अनुभव येण्यासाठी मनुष्याठायी अतींद्रिय असणे अत्यावश्यक आहे आणि ते आपण स्वतः ब्रह्म झाल्याशिवाय किंवा ब्रह्मस्थिती गाठल्यावाशिवाय संपादन करू शकत नाही.)
कारण ते म्हणतात जे देहात आहेत त्यांना देहच आवडतो म्हणजेच जे शरीरात आहेत त्यांना शरीरचं आवडते आणि ते सर्वकाही देखील मग शरीराच्या मापानेच मोजतात. आणि त्यामुळे त्यांची साधारण दृष्टीदेखील देहापर्यंतच झेप घेते. त्यापल्याड ती विचार करू शकत नाही आणि पोहचूदेखील शकत नाही आणि म्हणूनच आत(मनात) जसे आहे तसेच बाहेर देखील जर दिसू लागले तरच दोन गोष्टींचा संबंध जोडता येतो, ताळमेळ पडतो परंतु तसे न झाल्यास गोधंळ उडतो. (म्हणजेच आपण जसा मनात विचार करतो तसेच बाह्यदृष्टिला दिसले म्हणजेच शरीराने अनुभवता आले तर आणि तरच ते आपल्याला पटते, अन्यथा नाही.)
ते पुढे म्हणतात ज्याप्रमाणे माता-पुत्राची भेट होताना पाहणे हे जसे कोणालाही अपूर्व दृश्य वाटते, म्हणजेच ते जसे डोळ्यांना दिसते तसेच अनुभवता देखील येते, म्हणजेच वियोग पाहताना जसे रडू येते आणि भेट घडल्यावर जसे पाहणाऱ्याला देखील हर्ष होतो अगदी तसेच. म्हणजेच एका गोष्टीने दुसरे कळून चुकते, जसे चांगल्याने चांगले कळते आणि वाईटाने वाईट.
म्हणजेच ऐकीव गोष्टीचा जसाच्या तसा अनुभव घेता आला तरच ती गोष्ट पचनी पडते नाहीतर ती अधिकच गोंधळात घालून सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही संभ्रमात टाकते. आणि म्हणूनच ते म्हणतात देवाचे वाचेने होणारे वर्णन मनाने अनुभवता न आल्याने ह्या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी ताळमेळ बसत नाही आणि म्हणून नेमका देव कसा आहे हे सांगता येत नाही.
अभंग ३२०८
*********************************************
🚩🚩किंबुहना ते म्हणतात की हे देवा तुझे रूप वर्णन करण्याइतकी देखील बुद्धी माझ्यापाशी नाही, ते म्हणतात जे वेद, श्रुतींना आजवर जमले नाही किंबहुना तुझ्या वर्णातीताचे वर्णन करता करता त्यांनी देखील शेवटी मौनच धारण केले तेथे मी तुझे वाचेने काय वर्णन करणार...
*********************************************
तुझे वर्णू गुण ऐसी नाही मती । राहिल्या त्या श्रुती मौन्यपणे ।।
मौन्यपणे वाचा थोटावल्या चारी । ऐसे तुझे हरी रूप आहे ।।
रूप तुझे ऐसे डोळा न देखवे । जेथे हे झकवे ब्रम्हादिक ।।
ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी । म्हणोनी आटाआटी फार त्यांसी ।।
तुका म्हणे तुझे गुण नाम रूप । आहेसी अमूप वाणू काय ।।
*********************************************
तुकाराम महाराज म्हणतात हे देवा, हे श्री हरी तुझे गुण वर्णावे, तुझी कीर्ती सांगावी एवढी माझी बुद्धी नाही आणि क्षमताही नाही, श्रुती-पुराणे देखील तुझे वर्णन करताना मौन होतात, स्तब्द्ध होतात तेथे माझी काय धडगत. ते म्हणतात हे हरी, हे नारायणा तुझे रूप देखील असे आहे की त्याचे वर्णन करताना मनुष्याकडे असणाऱ्या चारही वाचा म्हणजेच परा,पश्यंती, मध्यमा, वैखरी अक्षरशः कुंठीत होतात किंबहुना त्या असमर्थच ठरतात. एवढेच नव्हे तर तुमचे रूप एवढे भव्यदिव्य आहे की साध्या डोळ्यांना ते पाहवतही नाही, ते म्हणतात जेथे ब्रम्हादिक (ब्रह्मलोकातील देव) देखील कमी पडतात, तेथे आमची काय कथा?
ते पुढे म्हणतात परंतु ब्रम्हादिकांना ही भव्य सृष्टी निर्माण करण्याचे बंधन आहे म्हणजे त्यांच्यावर पडलेली जबाबदारीच वेगळी आहे व त्यासाठी त्यानांही तुझ्या कृपाप्रसादासाठी खूप खटाटोप करावा लागतो व अशाने एकंदरीत ते दुसऱ्याच फंद्यात पडलेले आहेत व त्यामुळे तुझी गुणसंकीर्तने गाणे त्यांच्या भाग्यात नाही. परंतु तुकोबाराय शेवटी म्हणतात हे देवा, हे पांडुरंगा हे असे कितीही असले तरी तुझे गुण, तुला मिळालेली नामे आणि तुझी रूपे ही असंख्य आहेत, अमूप आहेत त्यामुळे मी आता ते काय व किती वर्णन करणार. किंबहुना त्याचे वर्णन करणे व गुण गाणे येथे कोणालाही शक्य नाही, अगदी कोणालाही. त्यामुळे ही एक अशक्य कोटीतीलच गोष्ट आहे.
अभंग ४१०
*********************************************
🚩🚩कारण ते म्हणतात जेथे वेदांना जमले नाही तेथे मी काय तुझी स्तुती आणि वर्णन करणार? परंतु तू आम्हांला एवढा प्रिय आहेस, एवढा जिव्हाळ्याचा आहेस की न राहवून आम्ही तुझी स्तुती करतोच आणि त्या फंदात पडतोच ती स्तुती कशीही असली तरीही आणि त्याचा परिणाम म्ह्णून त्याने आमची वाचादेखील मग गोडावते किंबहुना सुखावतेच...
*********************************************
स्तुती करू तरी नव्हेचि या वेदा । तेथे माझा धंदा कोणीकडे ।।
परी हे वैखरी गोडावली सुखे । रसना रस मुखे इच्छीतसे ।।
रूप वर्णावया कोठे पुरे मती । रोमी होती जाती ब्रह्मांडे ही ।।
तुका म्हणे तूच ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा जाली नाही ।।
*********************************************
तुकाराम महाराज म्हणतात की वेद देखील जेव्हा देवाची म्हणजेच श्री हरीची स्तुती करू गेले तेव्हा त्यांनादेखील मूक गिळून गप्प बसावे लागले, माघार घ्यावी लागली. ते म्हणतात जे ह्या वेदांना जमले नाही ते मला कोठून आणि कसे जमणार, म्हणजेच देवाची स्तुती करणे हे माझ्या काही आवाक्यातील गोष्ट नाही किंबहुना तो माझा धंदाच नाही.
ते म्हणतात परंतु तरीदेखील वाचेने तुझी गुण गाणे, तुझे स्वरूप वर्णन करणे आम्हांस अतिशय आवडते, तुझी मनभरेपर्यंत स्तुती करणे, गोडवे गाणे आम्हांला अतिशय आवडते किंबहुना तुझे गौरवगुण गाऊन माझी वाणी मात्र गोडावली आहे, माझ्या जिभेला त्या गोडव्याचा आता एवढा लोभ आहे की ती सारखे त्याच एका गोष्टीच रस चाखू पाहते आणि त्याचीच इच्छा धरते असते.
परंतु श्री हरी नारायणाची संपूर्ण स्तुती करण्याची मती मात्र आमच्याकडे नाही कारण तेवढी आमची बुद्धीच नाही. ते म्हणतात ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे श्री हरीच्या अंगावरील रंध्रांतून म्हणजेच रोमारोमातून असंख्य ब्रह्मांडे नित्य जन्माला येत-जात असतात, त्याचेच वर्णन करणे अवघड असून त्याच्या संपूर्ण स्वरूपाचे आणि असंख्य रूपांची कोण आणि कसे वर्णन करणार त्यामुळे तो विषयच राहूदे.
तुकोबाराय शेवटी म्हणतात हे देवा, हे श्री हरि ह्या विश्वात तूच एक असा आहेस की तुझ्या स्वरूपाचे कोणीही वर्णन करू शकत नाही किंबहुना तू नेमका अमुक स्वरूपाचा आहेस, तुझे रूप नेमके असे आहे हे सांगणारी वाचा अजूनतरी कोणाची झाली नाही किंवा तशी ती कोणापाशीही नाही.
अभंग ३१५
*********************************************
🚩🚩म्हणून ते म्हणतात येथे खुद्द श्रीहरी शिवाय त्याचे रूप आणि स्वरूप इतर कोणीही वर्णन करू शकत नाही आणि त्याने ठरविले तर आणि तरच ते त्याच्या भक्तांना कळून येते, अन्यथा नाही.
*********************************************
तुज वर्णी ऐसा तुजविण नाही । दुजा कोणी तीही त्रिभुवनी ।।
सहस्त्रमुखे शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिवा त्याच्या ।।
अव्यक्ता अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सच्चीदानंदा नारायणा ।।
रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणे ।।
तुका म्हणे जरी दाविसी आपणा । तरिच नारायणा कळों येसी ।।
*********************************************
तुकाराम महाराज म्हणतात हे श्री हरी, हे नारायणा, येथे तुझी स्तुती करण्यासाठी एक तुझ्याशिवाय आणि तुझ्याव्यतिरिक्त ह्या तिन्ही लोकांत दुसरा कोणीही नाही कारण तुला ओळखणारा तू येथे एकटाच समर्थ असून ते सामर्थ्य इतर कोणातही नाही. ते म्हणतात सहस्त्र मुखे असलेला तुझा शेष नाग देखील तुझी स्तुती करून दमला, शिणला, भागला, बिचाऱ्याच्या धडधाकट असलेल्या जिव्हांना चिरा जायची पाळी आली परंतु तुझी स्तुती काही संपूर्णरीत्या होऊ शकली नाही. ते म्हणतात की असा 'अव्यक्त, अलक्ष, अपार आणि अनंत असलेला तू, निर्गुण सच्चीदानंद नारायण असलेला तू स्वइच्छेनेच रूप आणि नाम धारण करतोस किंवा तुझ्या भक्ताचा जसा तुझ्याप्रती भाव असेल तू त्यासाठी तसाच अवतार घेतोस, म्हणजेच येथे सर्वकाही तुझ्या मर्जीने आणि सत्तेनेच चालते, त्यात इतर कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की त्यामुळे तू जर मनात आणलेस तरच येथे तुला पुजणारे किंवा तुझे भक्तगण तुला ओळखू शकतील, अन्यथा नाही. म्हणजे तुला जर स्वतःचे स्वरूप कोणाला दाखवावे वाटले किंवा तुला जर तशी इच्छा झाली तरच तुझे स्वरूप बघणाऱ्याला कळून येईल, अन्यथा नाही.
अभंग ३१६
*********************************************
🚩🚩म्हणूनच ते देवाला विचारतात की हे देवा नेमक्या कोणत्या मार्गाने किंवा साधनाने तुझे खरे स्वरूप आम्हांला कळून येईल ह्याचे वर्म आता तूच आम्हांला सांग...
*********************************************
कैसे करू ध्यान कैसे पाहो तुज । वर्म दावी मज याचकासी ।।
कैसी भक्ति करू सांग तुझी सेवा । कोण्या भाव देवा आतुडसी ।।
कैसी कीर्ती वाणू कैसा लक्षा आणू । जाणू हा कवणू कैसा तुज ।।
कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती । कैसी स्थिती मती दावी मज ।।
तुका म्हणे जैसे दास केले देवा । तैसे हे अनुभवा आणी मज ।।
*********************************************
तुकाराम महाराज देवाला उद्देशून म्हणतात की हे देवा नारायणा मी तुझे ध्यान नेमके करू तरी कसे, तुझे रूप नेमके कसे पाहू किंवा काय केले असता ते मला दिसून येईल आणि कळून येईल, याचे आता कृपा करून तूच मला गूढ सांग किंबहुना तूच आता त्याचे वर्म उकल आणि तुझ्या याचकाला म्हणजे मला कळेल असे कर.
ते पुढे म्हणतात की हे देवा तुला रुचेल आणि आवडेल अशी तुझी भक्ती मी कशी करू हे देखील आता तूच सांग आणि तूच मला सांग की तुझी सेवा नेमकी कशी करावी जेणेकरून तू मला प्रसन्न होशील आणि माझ्या पदरात पडशील.
ते म्हणतात एवढेच नव्हे तर तुझी कीर्ती मी नेमकी कशी वर्णन करू? तुझे ध्यान कसे लावू? आणि तुला कसे किंवा कोणत्या मार्गाने जाणून घेऊ? हे सर्वदेखील तू स्वतःच आता मला सांग. ते म्हणतात तसेच तुझे गुणगान मी कसे गाऊ, तुला चित्ती कसे ठेवू, म्हणजेच अशा त्या स्थितीला नेमका मी कसा जाऊ ह्याचेदेखील तूच मला आता कळेल अशा शब्दात निरूपण कर किंवा मलाच स्वतःला ते आपसूक समजून येईल निदान अशी मती तरी दे.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की देवा, हे विठुराया ज्याप्रमाणे तू मला तुझे दास करवून घेतलेस त्याप्रमाणे तूच मला आता ह्या सर्वांचा अनुभवदेखील दे किंवा अनुभवातून शिकवण दे.
अभंग ३२१
*********************************************
🚩🚩कारण ते म्हणतात की येथे असा कोण आहे जो ह्या श्री हरिचा, ह्या अनंताचा पार जाणू शकतो किंवा अंतपार शोधू शकतो किंवा ज्याने शोधून काढला आहे? परंतु संतांना शरण गेल्यावर तुम्हांला नक्कीच त्याचा शोध लागेल आणि त्याचे स्वरूप कळल्याशिवाय राहणार नाही...
*********************************************
कोण त्याचा पार पाववी धुंडिता । पुढे विचारता विश्वंभरा ।।
अणुरेणू सूक्ष्म स्थुळा पार नाही । श्रुती नेती त्याही खुंटलिया ।।
फळांत कीटक एवढे आकाश । ऐसी तरुवरास अनेक किती ।।
दाविले अनंते अर्जुनासि पोटी । आणिक त्या सृष्टी कृष्ण लोक ।।
तुका म्हणे लागा संतांचिया कासे । ठाव घेता कैसे वाचा जीवे ।।
*********************************************
तुकाराम महाराज म्हणतात की येथे कोण असा आहे जो त्या एका श्रीहरीचा अंतपार लावू शकतो किंवा त्याचा आधी-मध्य-अंत शोधून काढू शकतो किंवा तसा तो आजवर कोणी शोधून काढला आहे सांगा मला? ते म्हणतात तसा विचारदेखील करू गेलो तरी बुद्धीला ते शक्य होत नाही त्यामुळे अशा ह्या विश्वंभराचा पार लागणे काहीकेल्या शक्य नाही.
ते म्हणतात जो अणूरेणूपेक्षाही सूक्ष्म असून कोणत्याही स्थूल गोष्टीशीही म्हणजेच कोणत्याही भव्य-दिव्य वस्तुशीही त्याची तुलना करू शकत नाही किंबहुना ती होऊच शकत नाही आणि म्हणूनच वेद-श्रुतीदेखील 'नेती नेती' असे म्हणून मौनावल्या किंबहुना जागच्या जागी खुंटल्या किंबहुना न राहवून त्यांनी शेवटी माघारच घेतली.
ते पुढे म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या फळात जसा एक लहान कीटक असतो अशा त्या एका कीटकाएवढे आकाश त्याच्यापोटी सामावलेले आहे आणि अशी कितीतरी फळे असणारी कितीतरी झाडे त्याच्या पोटी असतील ह्याची गणती नाही. आणि अशा कितीतरी सृष्टी आणि वर कृष्णलोक देखील अनंताने म्हणजेच श्री हरिने अर्जुनाला स्वतःच्या पोटी दाखवून दिल्या आहेत.
तुकोबाराय शेवटी म्हणतात म्हणून माझी येथे प्रत्येकास विनंती आहे की अशा ह्या विश्वंभराचे ज्ञान होण्यासाठी, किंवा नेमका त्याचा ठावठिकाणा लागण्यासाठी किंवा त्याचे रूप आणि स्वरूप जाणूण घेण्यासाठी तुम्ही संतांना शरण जा, त्यांची कास धरा, त्यांच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा करा तेव्हा कोठे जाऊन त्यांच्या कृपेने मग तुम्हांला ह्या विश्वंभराचा खऱ्या अर्थाने शोध लागेल आणि त्याचे शद्बातीत असलेले स्वरूप जातीने अनुभवास येईल.
अभंग ३१३
*********************************************
🚩🚩परंतु जेव्हा त्यांना देवाच्या स्वरूपाचा हळूहळू अनुभव किंवा अंदाज येऊ लागतो तेव्हा ते म्हणतात देवाचे स्वरूप हे तर मनवाचातीत आहे, म्हणजेच मन आणि शद्बाच्या पलीकडचे असून ते मोजण्यास माप देखील शुद्ध भावाचे आणि निर्मल भक्तीचे असावे....
*********************************************
मनवाचातीत तुझे हे स्वरूप । म्हणोनिया माप भक्ति केले ।।
भक्तीचिया मापे मोजितो अनंता । इतराने तत्वता न मोजवे ।।
योग याग तपे देहाचिया योगे । ज्ञानाचिया लागे न सापडसी ।।
तुका म्हणे आम्ही भोळ्याभावे सेवा । घ्यावी जी केशवा करितो ऐसी ।।
*********************************************
तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला, हे नारायणा तुझे स्वरूप हे काया, वाचा आणि मन या तत्वांच्या पलीकडले आहे, तुला या तीन साधनांनी कोणीही मोजू शकत नाही आणि जाणूनही घेऊ शकत नाही आणि म्हणूनच तुझे हे अनाकलनीय स्वरूप मोजण्यासाठी, जाणून घेण्यासाठी मी भक्तीचेच माप केले आहे. कारण इतर कोणत्याही उपायांनी किंवा साधनांनी तुझे मोजमाप होऊ शकत नाही किंबहुना त्याचा साधा थांगपत्ता सुद्धा लागत नाही हे आता मला कळून चुकले आहे.
ते पुढे म्हणतात कोणीही येथे कितीही योगसाधना केल्या, कितीही तपे आचरलीत किंवा कितीही ज्ञान अर्जित केले तरीही तुझे स्वरूप, तुझी महती, तुझा थोरपणा या उपयांनी / या मार्गांनी जाणता येत नाही किंबहुना तू ह्या कोणत्याही साधनांच्या हातीच लागत नाहीस.
तुकोबाराय शेवटी म्हणतात आणि म्हणूनच सर्व साधने बाजूला सारून आम्ही ज्या भोळ्याभावाने तुझी सेवा करतो आहोत, भक्ती करत आहोत ती तू गोड मानून घ्यावीस, त्याचा आनंदाने स्वीकार करावास आणि आमच्या भावाचा शुद्धपणा पाहूनच मग त्याप्रमाणात आमच्यावर कृपा करावीस.
अभंग ४११
*********************************************
🚩🚩परंतु तरीदेखील काही शब्दज्ञानी आत्मज्ञानाशिवाय आणि अनुभवाशिवाय देवाचे स्वरूप वर्णन करू जातात त्यांना उद्देशून तुकोबाराय म्हणतात...
*********************************************
शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाही कोणा ।।
पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मिळती अर्थ निजसुखा ।।
तुका म्हणे जैसे लाचासाठी ग्वाही । देतील हे ठावी नाही वस्तु ।।
*********************************************
तुकाराम महाराज म्हणतात की येथे जे कोणी पुस्तकपंडीत आहेत, जे गीता, पुराण आणि इतर वेदशास्त्रांचे अभ्यासक आहेत ते त्यातील लिहिलेल्या शब्दांचा अर्थ समजावून सांगताना वाद घालतात, प्रत्येक जण ज्याप्रकारे जसा त्यांना अर्थ लागला आहे मग तशी स्वतःची मते पुढे ठेवतात आणि म्हणूनच शेवटी हे सवांद, ह्या चर्चा वादाला निमंत्रण देतात. कारण ते म्हणतात त्यात सांगितलेल्या गोष्टीचा येथे कोणापाशीही अनुभव नसल्याने आपल्याला उमगलेलल्या अर्थाचा आणि संतांनी सांगून ठेवलेल्या गोष्टींचा मेळ होत नाही कारण ह्या दोहोंतील भेद त्यांना करता येत नाही.
ते पुढे म्हणतात असे हे पंडित, वाचक आणि ज्ञानी लोक निरुपण करतील, कथा सांगतील परंतु त्यातील दडलेला खरा अर्थ त्यांना उमगलेला नसल्याने, त्यातील खरा गाभा त्यांना न गवसल्याने त्यांना त्यापासून निजसुख मिळत नाही. म्हणजेच नुसत्या ज्ञानाने किंवा त्याच्या संग्रहाने निजस्वरूपाची ओळख न झाल्याने किंबहुना त्याची अनुभूती न आल्याने त्यांना त्यापासून खरे सुख आणि समाधान मिळत नाही.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की त्यामुळे त्यांचे सगळे प्रयत्न आणि पांडित्य देखील व्यर्थ असते. उलट ते म्हणतात की ह्यालोकांचे न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्या लोकांप्रमाणे असते, ज्याप्रमाणे खोट्या साक्षीदाराला जशी खरी गोष्ट ठाऊक नसते, वस्तुस्थितीचे ज्ञान नसते परंतु फक्त आणि फक्त पैशासाठी ते छातीठोक पणे खोटे बोलून आव मात्र खऱ्याच आणतात, ह्यांचे देखील अगदी तसेच असते.
अभंग १५४
*********************************************
🚩🚩 ते म्हणतात तुम्ही कितीही वाचक, पंडित किंवा ज्ञानी असलात तरीही भोळेपणाशिवाय किंवा भोळ्या
भावाशिवाय तुम्हांस हे कळून येणार नाही…
*********************************************
उदंड शाहणे होत तर्कवंत । परि या नेणवे अंत विठोबाचा ।।
उदंड अक्षरा करोत भरोवरी । परि नेणवेचि थोरी विठोबाची ।।
तुका म्हणे नाही भोळेपणाविण । जाणीव ते सिण रिते माप ।।
*********************************************
तुकाराम महाराज हे त्या लोकांना उद्देशून म्हणतात जे या जगात तर्कबुद्धीने आणि पुस्तकी ज्ञानाच्या बळावर त्या श्रीहरीस जाणण्याचा प्रयत्न करतात किंवा जाणून घेण्याचा हट्ट धरतात. पण ते म्हणतात ह्या जगात असंख्य शहाणे, पंडित आणि तर्कवितर्क करणारे झाले आणि यापुढेही होतील परंतु कितीही झाले तरीदेखील ते काही या विठोबाचा उगम आणि अंत जाणू शकले नाहीत आणि यापुढेही जाणू शकणार नाहीत.
ते पुढे म्हणतात एवढेच नव्हे तर ह्या तर्काच्या बळावर ते कितीही आधीच असलेल्या अक्षरांत भर घालत राहिले तरीदेखील म्हणजेच श्री हरी विठ्ठलाच्या थोरवीविषयी त्यांनी कितीही गुणगान केले किंवा त्याविषयीचे ग्रंथ लिहिले तरीदेखील ते त्याची थोरी संपूर्णरीत्या केव्हाच जाणू शकत नाहीत आणि शकणारही नाहीत.
तुकोबाराय शेवटी म्हणतात जर येथे कोणाला श्री हरीला खरेच जाणून घ्यायचे असेल तर त्याच्याठायी भाव हा फक्त भोळेपणाचाच हवा. ते म्हणतात कारण स्वभावात आणि श्रद्धेत निरागसता आणि भाबडेपणा नसेल तर येथे कोणीही कितीही प्रयत्न केले तरी त्याचे सर्व प्रयत्न फोल जाऊन त्याच्या जाणिवेतच(पुस्तकी ज्ञानातच) काय ती फक्त भर पडेल परंतु भक्तीचे माप मात्र रितेच राहून शेवटी पदरी फक्त प्रयत्नांनी झालेला शीणच काय तो बाकी उरेल.
अभंग ४७४
*********************************************
🚩🚩 ते म्हणतात येथे असा कोणता पदार्थ आहे किंवा कोणती अशी वस्तू आहे ज्यात देव नाही, म्हणजेच जेथे चराचरात देवाचा वास आहे, त्याचे अस्तित्व आहे मग तो दगडात का असणार नाही परंतु ज्याच्याठायी भावच नाही त्यांना हे पटत नाही किंबहुना सांगून देखील काहीही फायदा होत नाही....
*********************************************
अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ।।
नाही भाव त्या सांगावे ते किती । आपुल्याला मती पाखंडीया।।
ज्या भावे संत बोलिले वचन । नाही अनुमोदन शाब्दिकांसी ।।
तुका म्हणे संती भाव केला बळी । न कळता खळी दुषिला देव ।।
*********************************************
तुकाराम महाराज म्हणतात हे अवघे विश्व ब्रह्मरूप आहे, ब्रह्मावाचून येथे एकही ठिकाण मोकळे नाही, रिते नाही. आणि असे असताना 'देवाच्या प्रतिमेमध्ये म्हणजेच मूर्तीमध्ये देव का असणार नाही' असा सवाल ते नास्तिकांना करतात. परंतु ज्यांच्या मनामध्ये देवाविषयी भावच नाही किंवा नसतो त्यांना मग कितीही सांगितले तरीही ते पटत नाही.
ते म्हणतात ज्या भावनेने किंवा ज्या भावाच्या जोरावर संत बोलतात ती भावनाच या पाखंडी लोकांच्या मनात नसल्याने ते या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत आणि म्हणून संतवचन देखील मानत नाहीत.
तुकोबाराय म्हणतात संतांनी पण सगुण भक्तीला प्राधान्य दिले आहे कारण त्यांनी स्वतःठायी देवाप्रती भाव एवढा दृढ केला आहे की त्या भावाच्या बळावर किंवा त्याच्या जोरावर मग ते कशातही देव पाहू शकतात. परंतु नास्तिकांना / खळांना ही साधी गोष्टच कळत नसल्याने त्यांनी देवालाच दूषित केले आहे. (म्हणजेच पुढीलप्रमाणे नाना शंकांना मनात स्थान देऊन ते एकप्रकारे देवाचीच विटंबना करतात. उदा. देवाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणे, तुमचा देवावर विश्वास आहे का ? जगात देव आहे का? आहे तर कोणी पहिले आहे का? आणि कीती लोकं देवाला मानतात/कीती मानत नाही? वगैरे वगैर)
अभंग १६६
*********************************************
🚩🚩ते म्हणतात आणि म्हणूनच जे भावाने आंधळे आहेत किंवा असतात मग त्यांच्यासाठी मग देव अस्तित्वातच नसतो...
*********************************************
आंधळ्यासी जग अवघेची आंधळे । आपणासी डोळे दृष्टी नाही ।।
रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न । तोंडासी कारण चवी नाही ।।
तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण । तया त्रिभुवन अवघे खोटे ।।
*********************************************
तुकाराम महाराज म्हणतात की जो मनुष्य आंधळा असतो, ज्याला दृष्टी नसते त्यासाठी मग सर्व जगच आधंळे असते.(कारण आपण नेहमी स्वतःवरूनच इतरांना जोखतो) त्याला वाटते आपल्याला जसे दिसत नाही, दृष्टी नाही त्याप्रमाणेच येथे इतरांना देखील दृष्टी नाही. किंवा ज्याप्रमाणे एखाद्या आजारी माणसाला, एखाद्या रोग्याला स्वतःच्या तोंडाची चव गेल्यामुळे मिष्टान्न देखील जसे विष-समान वाटू लागते अगदी त्याप्रमाणेच.
तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणेच जो मनुष्य स्वतः अंतःकरणातून शुद्ध नसतो, पवित्र आणि निर्मळ नसतो त्याला ह्या संसारातील किंबहुना ह्या त्रिभुवनातील सर्व माणसे देखील मग त्याच्यासारखीच अशुद्ध आणि खोटी वाटतात.
अभंग १६२
*********************************************
🚩🚩तुकोबा म्हणतात देवासाठी जो भक्ताच्या मनात उच्च कोटींचा भाव असतो तो भावच देव असतो, म्हणजे त्या भावालाच ते देव म्हणतात...
*********************************************
भाव देवाचे उचित । भाव तोचि भगवंत ।।
धन्य धन्य शुद्ध जाती । संदेह कैचा तेथें चित्ती ।।
बहुत बराडी । देवावरी ते आवडी ।।
तुका म्हणे रोकडे । लाभा अधिकारी चोखडे ।।
*********************************************
तुकाराम महाराज म्हणतात खऱ्या भक्ताच्याठायी देवासाठी किंवा देवाप्रती जो भाव असतो तो सर्वात उच्चकोटीचा असतो किंबहुना तो एवढ्या उच्च कोटींचा असतो, एवढा शुद्ध असतो की त्या भावातच भगवंत वास करतो. म्हणजेच हा भाव इतक्या उच्च कोटीचा आणि निर्मळ असतो की त्या भावात आणि भगवंतात काहीही फरक राहत नाही, तो भावच भगवंत होऊन जातो.
ते पुढे म्हणतात आणि म्हणूनच या समाजात तीच लोकं खऱ्या अर्थाने शुद्ध जातीची असतात ज्यांच्याठायी देवाविषयी किंचितदेखील संदेह नसतो आणि जी लोकं मग अशाप्रकारे देवावर निस्सीम भक्ती करतात तीच देवाला अतिशय प्रिय असतात.
तुकोबाराय शेवटी म्हणतात एखाद्या गोष्टीचा किंवा वस्तूचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्यासाठी लागणारी रोकड देखील जशी अस्सल लागते, त्याप्रमाणेच देवाच्या कृपेचा प्रसाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर मनात शुद्ध भाव लागतो, किंबहुना असेच भक्त देवाच्या कृपाप्रसादाचे खरे अधिकारी असतात किंवा मानकरी ठरतात. म्हणजेच त्यांना अनुभव देखील तेवढेच अलौकिक असे येतात.
अभंग २७३
*********************************************
🚩🚩ते पुढे म्हणतात की आणि जर का ठायी भाव बळवंत करायचा असेल तर त्यासाठी देवावर श्रद्धा हवी किंवा श्रद्धा युक्त भक्ती हवी जेणेकरून देवावरचा विश्वास दिवसेंगणिक वृद्धिंगत होत जाईल आणि तसा तो होण्यासाठी मनाचा निर्धार देखील पक्का हवा आणि त्यासाठी सुरुवात म्हणून वाकडेतिकडे असले तरीही मुखी त्याचे नाम हवे...
*********************************************
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाही देवे ।।
नाही तयावीण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्णा ।।
देवापाशी मागे आवडीची भक्ती । विश्वासेंशी प्रीती भावबळे ।।
तुका म्हणे मना सांगतो विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ।।
*********************************************
ज्यांना देवाची भक्ती कशी करावी हे ठाऊक नसते परंतु करावी असे जर का वाटत असेल त्यांना उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात की जरी तुमचा गळा गोड नसला किंवा देवाने जरी तुम्हाला सुस्वर दिला नसला आणि म्हणून तुम्हांला स्वरात गाता येत नसेल तरीही काही हरकत नाही कारण त्यासाठी देव मुळीच भुकेला नसतो किंबहुना देवाला त्याची चाडच नसते, तो फक्त आणि फक्त तुमच्याठायी उद्भवणाऱ्या भावाचा भुकेला असतो, प्रेमाचा भुकेला असतो आणि म्हणून तुम्हांला जसे जमेल किंवा जसे शक्य होईल तसे तुम्ही रामकृष्ण हा बीजमंत्र म्हणत राहावा. पारायणे करायचीच असतील तर ह्या मंत्राचीच करावीत.
ते म्हणतात तसेच तुम्हाला देवाजवळ काही मागायचे असेल तर त्याच्याकडे त्याच्या आवडीची भक्तीच मागा कारण आपण देवाला जर का काही देऊ शकतो तर ते फक्त आणि फक्त प्रेमच आणि देवाला देखील तेवढेच हवे असते, इतर मायिक पदार्थ त्याला रुचत देखील नाहीत आणि मुख्य म्हणजे तुमच्याठायी जन्माला येणाऱ्या ह्या शुद्ध भावामुळेच मग तुम्हांला जे काही अनुभव येऊ लागतील त्याने मग तुमचा त्याच्यावरचा विश्वास अजूनच दृढ होऊन त्याद्वारे तुमची त्याच्याप्रति प्रीतीची आणि प्रेमाची भावना अधिकच वाढीला लागेल, जोर धरेल किंबहुना दिवसेंदिवस ती अधिक बळावत जाईल.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की आणि तुम्हाला जर का हे साध्य करायचे असेल तर त्यासाठी लागणारा मनाचा निर्धार दिवसेंदिवस ठाम असू द्यावा, कोणत्याही कारणासाठी मग तो ढळू न द्यावा.
अभंग ७
*********************************************
🚩🚩कारण ह्या पुंडलिकाच्या प्रीतीसाठीच / प्रेमासाठीच देव पंढरीला आला आणि विटेवर उभा राहिला…
*********************************************
उदार चक्रवर्ती । वैकुंठीचा भूपती ।
पुंडलिकाचिया प्रीती । विटे उभा राहिला ।।
सर्वसिद्धींचा दातार । सवे आणिला परिवार ।
भक्तां अभयंकर । घ्या घ्या ऐसे म्हणतसे ।।
जेणे हे विश्व निर्मिले । महर्षी देवां संस्थापिले ।
एकवीस स्वर्गांत धरीले । सत्ता मात्र आपुलिया ।।
तुका म्हणे कृपावंत । इच्छिले पुरवी मनोरथ ।
रिद्धीसिद्धी मोक्ष देत । शेखी संग आपुला ।।
*********************************************
तुकाराम महाराज म्हणतात की उदार चक्रवर्ती असा हा वैकुंठीचा भूपती येथे ह्या पृथ्वीतलावर फक्त आणि फक्त पुंडलिकाच्या प्रेमासाठी / प्रीतीपोटी विटेवर उभा राहिला आहे. ते म्हणतात असा हा श्रीहरी सर्व सिद्धींचा दाता असून त्याने आपल्यासोबत स्वतःचा सर्व परिवार देखील आणला आहे आणि आपल्या भक्तांना माझ्याकडून हे अभयंकर म्हणजे निर्मळ असे 'दान घ्या' असे त्यांना म्हणतो आहे.
ते म्हणतात असा हा श्रीहरी सर्वसमर्थ असून त्याने आपल्या सामर्थ्याने आणि स्वतःच्या सत्तेने म्हणजेच आपल्या सत्तेच्या जोरावर हे संपूर्ण विश्व निर्मिले आहे, महर्षी देवांना संस्थापिले आणि एकवीस स्वर्गांना धरले आहे.
तुकोबाराय शेवटी म्हणतात असा हा कृपावंत त्याच्या भक्तांचे सर्व मनोरथ पुरवितो, त्यांनी इच्छिलेले सर्व त्यांच्या पदरात टाकतो, एवढेच नव्हे तर त्यांस सिद्धीसिद्धी सुद्धा देऊ करतो आणि शेवटी मोक्ष देखील देतो आणि हे कमी म्हणून की काय अंती शेखी म्हणजेच चितेवर आपला संग देखील देतो.
अभंग २८८०
*********************************************
🚩🚩ते म्हणतात अशारितीने आम्ही देखील आमच्या भक्तीच्या जोरावर, प्रेमाच्या बळावर जो गुणातीत आहे, वर्णनातीत आहे, रूपातीत आहे किंबुना जो ह्या सर्व जगाचे जीवनच आहे त्यास नाम, रूप आणि आकार घेण्यास भाग पाडले आणि त्याला इतरांसाठी देखील सहज आणि सुलभ करून ठेवले…
*********************************************
आमच्या हे आले भागा । जिव्हार या जगाचे ।।
धरुनिया ठेलो जीवे । बळकट भावे एकविध ।।
आणूनिया केला रूपा । उभा सोपा जवळी ।।
तुका म्हणे अंकित केला । खाली आला वचने ।।
*********************************************
तुकाराम महाराज म्हणतात आम्हीदेखील आमचा भाव अतिशय शुद्ध आणि भोळा केल्याने आमचे देखील भाग्य उजळले आहे कारण सर्व प्राणीमात्रांचे, या सर्व जगाचे जो जीवन आहे, जो सर्वस्व आहे, म्हणजेच असा हा पांडुरंग आमच्या भाग्याला आला आहे त्यामुळे त्याला आता मी सर्वभावाने म्हणजेच कायावाचामनानें एकनिष्ठ होऊन माझ्या हृदयाशी घट्ट धरून ठेवले आहे.
ते म्हणतात आम्ही आमच्या भावभक्तीच्या जोरावर अशा या निर्गुण-निराकार ईश्वराला सगुण-साकार रूपामध्ये आणून इतरांसाठी देखील तो अतिशय सुलभ आणि सोपा करून ठेवले आहे, किंबहुना त्याला सर्वांच्या समीपच आणून ठेवले आहे.
तुकोबाराय शेवटी म्हणतात माझ्या भक्तिभावाने मी त्याला माझा अंकितच केला आहे म्हणजेच तो आता माझ्या संपूर्ण स्वाधीन असून स्वतःचे वचन पूर्ण करण्यासाठी त्याला खाली यावेच लागले.
अभंग ४८८
#TukaramGatha #Abhang #SantTukaram #VitthalBhakti #TukaMhane
Shri Tukaram Gatha