योगीता चव्हाण साठी प्रोफाइल फोटो

'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान' यासाठी आधी संदर्भ पाहुयात.

तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याचे 'जन्माला येणे' किंवा 'यावे लागणे' यासाठी त्याचे पूर्वकर्मच कारण असून म्हणजे पूर्वजन्मातील पातकाचेच हे फळ असून ते भोगण्यासाठीच त्याला ह्या संसारात जन्म घ्यावा लागतो आणि म्हणून जन्माला आल्यावर वाट्याला आलेले भोग भोगतेवेळी त्याने ते समाधान चित्ताने भोगावे, कारण मनुष्याने त्यातून कितीही सुटण्याचा प्रयत्न केला तरीही मनुष्याची प्रारब्ध भोगून झाल्याशिवाय त्यातून सुटका होत नाही आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात की जेव्हा जेव्हा आपल्या वाट्याला भोग येतात तेव्हा तेव्हा त्याने ते आनंदाने भोगावे आणि त्या त्या परिस्थितीत देवाने आपल्याला जसे ठेवले आहे त्यातच समाधान मानावे किंबहुना कोणालाही त्याचा दोष न देता ते शांतपणे आणि समाधानाने भोगावेत...


जन्मा येणे घडे पातकाचे मूळ । संचिताचे फळ आपुलिया ।।

मग वायावीण दुःख वाहू नये । रुसोनीयां काय देवावरी ।।

ठाऊकाची आहे संसार दुःखाचा । चित्ती सीण याचा वाहू नये ।।

तुका म्हणे त्याचे नाव आठवावे । तेणे विसरावे जन्मदुःख ।।

*********************************************

तुकाराम महाराज म्हणतात की 'जन्माला येणे' किंवा 'जन्माला येण्याचे घडणे' हेच मनुष्याने केलेल्या पापाचे किंवा पातकाचे मूळ असून तेच आपल्या संचिताचे फळदेखील असते आणि प्रत्येकाने हे नीट लक्षात घेऊन संसारात येणाऱ्या दुःखकष्टांचे मनी व्यर्थ दुःख वाहू नये किंवा देवावरदेखील वाया रुसू नये.

ते म्हणतात की संसार हा दुःखाचाच असतो, कष्टप्रद असतो आणि हे सर्वांना आपसूकच ठाऊक असते आणि म्हणून चित्तात त्याविषयी व्यर्थ खेद आणि सीण वाहू नये.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की येथे फक्त मनुष्याच्या हातात असते ती एकच गोष्ट आणि ती म्हणजे देवाचे नाम घेणे, त्याची आठवण ठेवणे. ते म्हणतात येथे एक गोष्ट मात्र खरी असते आणि ती म्हणजे देवाचे स्मरण घडले असता, त्याला शरण गेले असता मनुष्य त्याचे जन्मदुःखच विसरतो किंबहुना त्याचे जन्ममरणाचे दुःखच संपुष्टात येते.

अभंग २०९९

*********************************************

🚩🚩म्हणून ते म्हणतात की येथे मनुष्याने संसारावर प्रेम न करता, म्हणजेच येथील व्यक्ती, गोष्ट आणि पदार्थांवर प्रेम न करता ते प्रेम त्याने देवाच्या चरणी अर्पण करावे जेणेकरून खरा लाभ त्याच्या पदरी येईल...

*********************************************

हेचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ।।

'ठेविले अनंते तैसेची राहावे । चित्ती असो द्यावे समाधान' ।।

वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ।।

तुका म्हणे घालू तयावरी भार । वाहू हा संसार देवापायी ।।

*********************************************

तुकाराम महाराज म्हणतात की या संसारावरची माया किंवा या जगावरचे प्रेम मनुष्याने देवाला अर्पण करावे किंबहुना आपले प्रेम ह्या संसारावर न जडता ते देवावर कसे जडेल हे पाहावे किंवा ते त्याच्या चरणी कसे रुजू होईल हे पाहावे किंबहुना तसे ते करण्याचा येथे प्रत्येकाने संकल्पच करावा. आणि एवढेच नव्हे तर या संसारात अनंताने, म्हणजेच श्रीहरीने जसे आपल्याला ठेवले आहे तसेच राहावे, त्याविषयी म्हणजेच आपल्या परिस्थितीविषयी खेद न बाळगता चित्तात त्याविषयी समाधान असू द्यावे.

कारण ते म्हणतात हे असे वर्तन ठेवणे किंवा असे आचरण असू देणे हीदेखील देवाची केलेली भक्ती असून हीच थोर भक्ती देवाला अतिशय प्रियदेखील असते.

ते म्हणतात परंतु तसे न करता संसारात लाभलेल्या दुःखाचे, संकटाचे जर का वाईट वाटून घेतले किंवा त्याविषयी उद्वेग व्यक्त केला तर तशाने काहीही लाभ होत नाही, उलट त्याद्वारे पदरात केवळ दुःखच पडते, मन अधिकच कष्टी होते कारण संचिताचे फळ भोगण्यावाचून येथे दुसरा पर्यायच नाही.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की त्यापेक्षा सर्वांनी आपला सर्व भार त्याच्यावर टाकून किंबहुना सर्व संसारच देवापायी वाहून ह्या संसारात अतिशय निश्चिंत मनाने राहावे.

अभंग २०९८

*********************************************

🚩🚩कारण ते शेवटी म्हणतात की येथे निश्चळ राहून जो देवाला सर्वभावे शरण जातो, ह्या संसारातील गोष्टी मिळवण्यासाठी व्यर्थ खटाटोप न करता त्याचे ध्यान करत बसतो त्याचा सर्वभार मग देव स्वतःच उचलतो, त्याला मग तो कसल्याही चिंतेत घालत नाही उलट बसल्याच जागी त्याचे सर्व कोड आणि इच्छा पुरवतो...

*********************************************

बैसोनि निश्चळ करी त्याचे ध्यान । देईल तो अन्नवस्त्र दाता ।।

काय आम्हा करणे अधिक साचुनी । देव झाला ऋणी पुरविता ।।

दयाळ मायाळ जाणे कळवळा । शरणागता लळा राखो जाणे ।।

नलगे मागणे सांगणे तयासी । जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ।।

तुका म्हणे लेई अळंकार अंगी । विठ्ठल हा जगी तूची होसी ।।

*********************************************

तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला फक्त एका जागी स्वस्थ बसून आणि भाव एकविध करून, म्हणेजच विठ्ठलाच्या पायी भाव एकनिष्ठ करून आणि मन निश्चळ करून त्याचे ध्यान करायचे आहे, म्हणजे तुमच्या सर्व गरजा अन्नावस्त्रासकट तो दाता(देव) बसल्याठिकाणीच पूर्ण करेल.

ते म्हणतात या न्यायाने तर आम्हांला आता पुढे काहीही करायचे शिल्लकच राहिलेले नाही, कारण देवच आता आमचा ऋणी झाल्याने तो आम्हांला आता सर्वकाही पुरवतो. (म्हणजेच आम्ही त्याचे नाव घेतल्याने व त्याद्वारे आमची सेवा घेतल्याने तो आमचा सेवाऋणी झाला आहे आणि आमच्या ऋणामध्ये अडकला गेला आहे, त्यामुळे त्याला आता आमचा सर्व योगक्षेम जातीने चालवावाच लागतो.)

ते पुढे म्हणतात असा हा माझा विठुराया अतिशय दयाळू, मायाळू आणि कृपाळू असून त्याच्या पोटी सर्वांसाठी कळवळा आणि वाव आहे आणि शरण आलेल्यांना तर आपले कसे करून घ्यावे, त्यांना कसे संरंक्षण द्यावे व त्यांना लळा कसा लावावा हे तो चांगलेच जाणतो.

एवढेच नव्हे तर एकदा का त्यावर सर्व भार सोपवला की पुढे त्याला काहीही सांगावे लागत नाही किंवा त्यापाशी काही मागायचीदेखील गरज पडत नाही, ते म्हणतात तो सर्वज्ञ असून आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा आणि मनोकामना तो चांगलेच जाणतो व त्या न सांगताच पूर्ण करतो.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की म्हणून तुम्ही सर्वांनीदेखील कंठात विठ्ठल नाम धारण करावे, दिवसरात्र त्याचे ध्यान करावे, अंगावर विठ्ठलरूपी अलंकार चढवावा, अशाने तुमचेदेखील मग अंतर आणि बाह्य स्वरूप पालटून तुम्ही स्वतःच ह्या जगी विठ्ठल व्हाल.

अभंग ६७२

*********************************************

🚩🚩परंतु ते म्हणतात की असे न करता येथे लोकं प्रारब्धातून सुटायचे नाना प्रयत्न करतात, त्याला कसे टाळता येईल हे पाहतात परंतु ते म्हणतात मनुष्याने तसे कितीही प्रयत्न केले तरीही प्रारब्ध भोगायचे शिल्लक राहतेच राहते...

*********************************************

वैद्य वाचविती जीवा । तरी कोण ध्याते देवा ।।

काय जाणो कैसे परी । प्रारब्ध ते ठेवी उरी ।।

अंगी दैवत संचरे । मग तेथे काय उरे ।।

नवसे कन्यापुत्र होती । तरी का करणे लागे पती ।।

जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ।।

*********************************************

तुकाराम महाराज म्हणतात की येथे वैद्यच जर खऱ्याअर्थाने रोग्याचे रोग निवारण करत असेल किंवा तोच जर एखाद्याचे जीव वाचवत असेल किंवा असता तर येथे देवाला कोणी आठवले असते का? कारण ते म्हणतात की प्रारब्ध ही एक अशी गोष्ट आहे की त्यापासून वाचण्यासाठी किंवा पाठ सोडवण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही ते काहीकेल्या तुमची पाठ सोडत नाही, त्यासाठीचे तुम्ही कितीही उपचार केले तरीदेखील ते कसे कोण जाणे किंवा थोड्या प्रमाणात का होईना मागे उरतेच.

ते पुढे म्हणतात तसेच दुसरीकडे आपण पाहतो की लोकांच्या अंगी दैवत संचारते, अंगात देवाचे वारे भरते, ते म्हणतात जर मनुष्याच्याच अंगी देवाचा संचार झाला किंवा होत असेल किंवा हे जर खरे मानून राहिलो तर अशा ठिकाणी तर बोलायचे काही कामच राहत नाही. म्हणजे तो मनुष्यच देव झाला असे मानून त्याला आता मनुष्यदेहाचे किंवा ह्या संसाराचे काही दुःखच राहिले नाही असेच म्हणावयास हवे.

आणि तिसरीकडे ते म्हणतात कन्यापुत्र होण्यासाठी जोडपे नवस करतात, त्याला साकडे घालून वेठीस धरतात परंतु नवसाने जर कन्यापुत्र होत असती तर स्त्रीला मग नवरा करायची गरजच लागली नसती, सर्व स्त्रियांना नवसानेच अपत्य झाली असती.

ते म्हणतात ह्या आणि अशा प्रश्नांची उत्तरे लोकांच्या बुद्धीच्या पलीकडली आहेत कारण हे सर्व एवढे विसंगती किंवा विरोधाभास निर्माण करणारे आहे की ह्या सर्वांची उत्तरे जर येथे कोणास ठाऊक असतील तर ती फक्त एकालाच ठाऊक आहेत आणि ती म्हणजे माझ्या स्वामीला, माझ्या दाताराला, म्हणजेच श्री हरी नारायणाला आणि तोच काय ती त्याची उत्तरे देऊ शकतो.

(म्हणजेच ते म्हणतात की ह्या सर्वांचे मूळ प्रत्येकाच्या प्रारब्धात आहे आणि ते शेवटी भोगुनच संपवावे लागते आणि त्यानंतरच देवाची कृपा होते…)

अभंग १८७

*********************************************
🚩🚩म्हणूनच ते म्हणतात की ज्याप्रमाणे तापल्याशिवाय सोन्याचे अलंकारात रूपांतर होत नाही त्याप्रमाणेच दुःख सहन केल्याशिवाय मनुष्यात धैर्य निपजत नाही आणि म्हणूनच प्रत्येकाने येथे आपल्या मनाला धीट बनवावे कारण अन्नालादेखील जोपर्यंत ते शिजून तयार होत नाही तोपर्यंत (अग्नीचा)जाळ सहन करावाच लागतो...
*********************************************

तापल्यावांचून नव्हे अळंकार । पिटूनियां सार उरले ते ।।

मग कदा काळी नव्हे शुद्ध जाती । नासे शत्रू होती मित्र तेचि ।।

कळी बरे भोगू द्यावे भोगा । फांसिले ते रोगा हाती सुटे ।।

तुका म्हणे मन करावे पाठेळ । साहावेंचि जाळ सिजेवरी ।।

*********************************************

तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे सोन्याला तापविल्याशिवाय आणि सर्वबाजुंनी नानातऱ्हेने ठोकल्याशिवाय त्यातून दागिना घडत नाही किंवा त्याला अलंकाराचे स्वरूप प्राप्त होत नाही, म्हणजेच जोपर्यंत त्यातील 'हीन' बाजूला सारले जात नाही तोपर्यंत त्याला ह्या प्रक्रियतेतून जावेच लागते आणि हीन सरल्यानंतर जे मागे उत्तम प्रतीचे सार उरते तोच खरा अलंकार.

ते म्हणतात मनुष्याचेदेखील अगदी तसेच आहे, एकदा का त्याच्यातील हीन बाजूला सारले गेले आणि त्याचे उत्तम प्रतीच्या मनुष्यात रूपांतर झाले की (म्हणजेच एकदा का भक्तीच्या मार्गाने जाऊन ज्ञानी भक्तात त्याचे रूपांतर झाले की) मग कोण त्याचे जात, कुळ, आचरण, रूप वगैरे लक्षात घेतो. म्हणजेच एकदा का उच्च पदावर तो आरूढ झाला की मग तो शुद्ध जातीचा आहे की नाही किंवा त्याने नीच योनीत जन्म घेतला होता का? हे सर्व कोण बघत बसत नाही किंबहुना अशावेळी ते सर्व फोल ठरते आणि मग त्याच जन्मात त्याचे असलेले शत्रूदेखील नासून जाऊन तेच पुढे जाऊन त्याचे घनिष्ठ मित्र होऊन ठाकतात.

आणि म्हणूनच ते म्हणतात की देहाला त्याच्या प्रारब्धानुसार जे काही भोग असतील ते भोगू द्यावेत, त्यात आपण आडकाठी करू नये आणि जे येथे कठोर प्रारब्ध कपाळी घेऊन आले आहेत त्यासाठी मग त्याला रोगाच्याच वाटेने जावेच लागते, म्हणजेच त्यांना नानाविध व्याधींना सामोरे जाऊन आणि पदोपदी मरणयातना भोगुनच मग त्यांची त्यांच्या पूर्ण प्रारब्धातून सुटका होते.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की म्हणूनच मनुष्याने येथे स्वतःच्या मनाला सोशिक बनवावे, त्याला धीर धरावयास शिकवावा, म्हणजेच धैर्याने घेण्यास शिकवावे कारण ते म्हणतात की ज्याप्रमाणे अन्नाला देखील शिजेपर्यंत जाळ सहन करावाच लागतो त्याप्रमाणेच मनुष्याला देखील तो संपूर्ण शुद्ध आणि परिपक्व होत नाही तोपर्यंत भोग भोगावेच लागतात.

अभंग १६४०

*********************************************
🚩🚩आणि म्हणूनच ते देवाला उद्देशून म्हणतात की हे देवा आता माझे काहीही होवो किंवा काही झाले तरी चालेल परंतु तू आता माझ्याकडे किंचितदेखील आणि एकक्षणदेखील दुर्लक्ष करू नकोस किंबहुना तुझी मेहेरनजर किंवा तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव तशीच ठेव...
*********************************************

न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ।।

ऐशी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हेचि सांगे ।।

विटंबो शरीर होत का विपत्ती । परी राहो चित्ती नारायण ।।

तुका म्हणे नाशिवंत हे सकळ । आठवे गोपाळ तेचि हित ।।

*********************************************

तुकाराम महाराज म्हणतात की एकवेळ मला खावयास अन्न नाही मिळाले तरी चालेल किंवा माझ्या पोटी संतानाची वाढ नाही झाली तरी चालेल परंतु तुझी मात्र कोणत्याही परिस्थितीत माझ्यावर सदैव कृपा अशीच राहो देत हीच काय ती माझी आता इच्छा आहे आणि तुझ्या चरणी प्रार्थना आहे. ते म्हणतात आणि माझी वाचादेखील मला आता हाच उपदेश करते आणि लोकांनादेखील नित्य ती हेच सांगते.

ते पुढे म्हणतात एवढेच नव्हे तर या शरीराची आता कितीही विटंबना झाली तरी चालेल किंवा यापुढे माझ्यावर कितीही विपत्ती आली तरी चालेल परंतु चित्तात मात्र नारायणाचे स्मरण सदैव राहू देत असे कर.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की कारण हा मृत्यूलोक असून येथे सर्वकाही नाशिवंत आहे, सर्वकाही क्षणभंगुर असून कधी नाश पावेल ह्याचा नेम नाही आणि त्यामुळे चित्तात सदैव देवाची आठवण ठेवणे, त्या गोपाळाचे स्मरण करणे ह्यातच मनुष्याचे खरे हित दडलेले आहे.

अभंग २४७

*********************************************
🚩🚩म्हणूनच ते म्हणतात मनुष्याने आलेल्या भोगाप्रति सादर असावे म्हणजेच आदराने सामोरे जावे किंबहुना सर्वभार त्याच्यावर सोपवून भोगाला सामोरे गेले असता मग त्याला भोगाचे काहीही वाटत नाही कारण शरण आलेल्यांचे दुःख निवारण्याचे काम देवाला करावेच लागते...

*********************************************

आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालूनिया ।।

मग तो कृपासिंधु निवारी सांकडे । येर ते बापुडे काय रंक ।।

भयाचिये पोटी दुःखाचिये रासी । शरण देवासी जाता भले ।।

तुका म्हणे नव्हे काय त्या करिता । चिंतावा तो आता विश्वंभर ।।

*********************************************

तुकाराम महाराज म्हणतात संचितामुळे निर्माण झालेल्या भोगाला सामोरे जाण्यास माणसाने नेहमी तत्पर असावे, किंबहुना आपला सर्व भार त्या एका नारायणावर घालून समोर असलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याचे धाडस दाखवावे, कारण ते म्हणतात असे केल्यानेच मग तो कृपासिंधू आपल्यावरच्या संकटाचे निश्चितपणे निवारण करून आपले रक्षण करतो. ते म्हणतात परंतु काही लोकं तसे ना करता ते निवारण्यासाठी वायाच स्वतः प्रयत्न घेतात आणि आपला वेळ आणि शक्ती उगीच खर्ची घालतात आणि परिस्थिती अजूनच बिकट करून सोडतात, ते म्हणतात असे करून मग ते अधिकच बापुडे आणि दिन होतात.

ते पुढे म्हणतात मनुष्याच्या पोटी असलेली भीतीच नेहमी त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरते आणि त्याच्या समोर संकटाचे अजूनच मोठमोठाले डोंगर उभे करते. ते म्हणतात त्यापेक्षा देवाला शरण गेलेले केव्हाही चांगले कारण एकदा का विठाईला शरण गेले की मग मनुष्याला कसलीच भीती उरत नाही उलट एक आगळ्याच प्रकारचे बळ त्याच्या अंगी येते.

तुकोबाराय शेवटी म्हणतात कारण त्या एका विठ्ठलाला या संसारात, या विश्वात काय करणे अशक्य आहे, असे काय आहे जो तो करू शकत नाही सांगा मला किंबहुना त्याच्या एकाच्या सत्तेनेच तर हे जग चालते, त्यामुळे प्रत्येकाने आता एवढेच करावे आणि मनी त्या विश्वंभराचे चिंतन करावे.

अभंग १६३६

*********************************************
🚩🚩सर्वाचे सार...

*********************************************

भोग तो न घडे संचितावाचूनि । करावे ते मनी समाधान ।।

म्हणउनि मनी मानू नये खेदु । म्हणावा गोविंदु वेळोवेळा ।।

आणिका रुसावे न लगे बहुता । आपुल्या संचितावाचुनिया ।।

तुका म्हणे भार घातलियावरी । होईल कैवारी नारायण ।।

*********************************************

तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याच्या वाट्याला येणारे भोग हे त्याच्या संचितामुळे, पूर्व कर्मांमुळे असतात. त्यामुळे ते भोगतेवेळी ते त्याने समाधान चित्ताने भोगावेत. किंबहुना आपल्याच पूर्वकर्माचे ते फळ असल्याने त्याविषयी मनात किंचितही खेद मानू नये. उलट अशावेळी वाचेने त्या एका श्री हरी गोविंदाचे नाम घ्यावे, त्याच्या नामाचा जयघोष करावा आणि मुख्य म्हणजे आपण भोगत असलेले भोग आपल्याच प्रारब्धाचे फळ असल्याने त्या भोगांना कंटाळून किंवा त्याचा मनस्ताप म्हणून इतर कोणावरही रुसू नये किंवा कोपू नये किंबहुना रुसावे लागल्यास त्याने आपल्या दैवावरच रुसावे. म्हणजे एका आपल्या नशिबाशिवाय किंवा संचिताशिवाय त्याने अन्य कोणावरही रुसू नये.

तुकोबाराय शेवटी म्हणतात परंतु ह्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो. म्हणजेच अशा परिस्थितीतून सहीसलामत सुटण्यासाठी मी तुम्हांला एक युक्ती सांगतो. ते म्हणतात देवाला श्रद्धेने शरण जाऊन जर एखाद्याने आपला संपूर्ण भार त्यावर टाकल्यास मग देवालाही तो स्वतःच्या खांद्यावर घ्यावाच लागतो आणि शरण आलेल्यांचे रक्षण करावेच लागते . कारण ते म्हणतात शरण आलेल्यांना नारायण कधीही रिकाम्या हाताने धाडत नाही उलट त्यांचा कैवार घेऊन, त्यांना पाठीशी घालून किंबहुना त्यांचा संपूर्ण अंगीकारच करून त्यांचे सर्व भोग मग तो स्वतःच भोगतो.

अभंग १६३७

#TukaramGatha #Abhang #SantTukaram #VitthalBhakti #TukaMhane

या प्रश्नासाठी 5 इतर उत्तरे पहा