देव / परब्रह्म भक्तांसाठी, मग ते त्यांच्या कल्याणासाठी असो किंवा त्यांच्या रक्षणासाठी, जे रूप आणि नाम धारण करतो त्याला अवतार असे म्हणतात किंवा धर्माचे रक्षण करण्यासाठी त्याला मनुष्य योनीत जो काही जन्म घ्यावा लागतो तो देखील अवतारच. उदा. श्री रामाचा / हनुमानाचा / श्री कृष्णाचा.
ज्ञानेश्वरीत देवाने म्हणजेच श्री हरी स्वतःने सांगितल्याप्रमाणे तो नेहमी अमूर्त(abstract) / अव्यक्त (non-manifested) स्वरूपात असतो (God always dwells in abstract and absolute form), परंतु भक्त-कल्याणासाठी, त्याच्या रक्षणासाठी तो जेव्हा त्वरित कोणत्या ना कोणत्या रूपात भूतलावर येतो त्या रूपालादेखील अवतार म्हणतात, म्हणजेच प्रत्येकवेळी तो मनुष्याचेच रूप आणि नाम घेऊन येईल असे नाही तर तो कोणाचेही, अगदी कोणाचेही रूप तो धारण करतो. ते तुकोबांच्या पुढील अभंगातून स्पष्ट होईलच...
आम्हासाठी अवतार । मत्स्यकूर्मादी सुकर ।।
मोहे धावे घाली पान्हा । नाव घेता पंढरीराणा ।।
कोठे न दिसे पाहता । उडी घाली अवचिता ।।
सुख ठेवी आम्हासाठी । दुःख आपणची घोटी ।।
आम्हा घाली पाठीकडे । आपण कळीकाळासी भिडे ।।
तुका म्हणे कृपानिधी । आम्हा उतरी नावेमधी ।।
*******************
तुकाराम महाराज म्हणतात की श्री हरी नारायणाने आजतागायत मत्स्य(मासा), कूर्म(कासव), वराह(डुक्कर) आदी जे अवतार घेतले आहेत किंवा जी नाम-रूपे धारण केली आहेत ती सर्वच्या सर्व त्याने आपल्या भक्तांसाठी, त्यांच्या प्रेमाखातर आणि त्यांच्या संरक्षणासाठी घेतले आणि यापुढेही घेईल .
ते म्हणतात ही माउली इतकी प्रेमळ आहे, दयाळू आणि कृपाळू आहे की नुसते 'पंढरिराया' असे नाम जरी घेतले तरी तिला प्रेमाचा पाझर फुटतो आणि मग ती त्या प्रेमाच्या मोहात आपल्या भक्तांसाठी धावत येते. ते म्हणतात एरव्ही इत्ररत्र नजर फिरविली असता ती कोठेही दिसत नाही परंतु तिच्या नामाचा टाहो फोडल्यास कोण जाणे ती कुठून उडी घेते व समोर हजर होते.
ते म्हणतात अशी ही आई, ही माउली आमची सर्व संकटे स्वतःवर घेऊन आणि आमचे सर्व दुःख स्वतःच घोटून आमच्यासाठी मागे केवळ प्रेमच ठेवते. एवढेच नव्हे तर दडी देऊन बसलेला काळ जेव्हा अचानक तिच्या भक्तांवर उडी घालतो तेव्हा ती त्याच्याशी देखील भिडते, त्यांना पाठीशी घालून ती स्वतःच मग त्या काळाशी दोन हात करते.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की ही माउली एवढी कृपावंत आहे की तिला तिच्या भक्तांच्या इहलोकाचीच नव्हे तर परलोकाची देखील चिंता असते, दोन्हीकडे त्यांचा प्रवास आणि प्रवेश सुखरूप व्हावा असेच ती करते आणि त्यासाठी म्हणजेच त्यांचे कल्याण व्हावे, त्यांचा उद्धार व्हावा व त्यांना पुढे जाऊन मोक्षसुख मिळावे यासाठी ती स्वतःच त्यांना हाताने धरून हा भवसागर पार करण्यासाठी नावेमधे बसविते व पार देखील करविते.
अभंग २६४
*********************************************
🚩🚩देवाला देखील धर्माचे रक्षण करण्यासाठी जन्म घ्यावा लागतो...
*********************************************
दया तिचे नाव भुतांचे पाळण । आणिक निर्दळपण कंटकांचे ।।
धर्म नीतीचा हा ऐक वेव्हार । निवडीलें सार असार ते ।।
पाप त्याचे नाव न विचारी मीत । भलतेची उन्मत्त करी सदा ।।
तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी । देवासही आटी जन्म घेणे ।।
*******************
तुकाराम महाराज म्हणतात सर्व भूतमात्रांचे रक्षण करणे, निदान त्यादृष्टीने प्रयत्न करणे आणि जे समाजाला अपायकारक आणि त्रास देणारे घटक आहेत त्यांचे निर्दालन करणे किंवा संपूर्ण उच्चाटन करणे ह्याचेच नाव दया असून पाप म्हणजे नीती-नियमांचा विचार न करता उन्मत्त होऊन इतरांना अपाय आणि त्रास होईल असेच सदैव वर्तन करणे.
ते म्हणतात येथे ज्यांना नेमका धर्म म्हणजे काय? किंवा धर्मनिती कशी असावी? आणि त्यासाठीचा व्यवहार कसा असावा? हेच जर ठाऊक नसेल तर त्यांच्यासाठी हे वर्म असून आयुष्याचे सार आणि असार अशारितीने मी निवडून तुम्हां समोर मांडले आहे. तेव्हा इतर सर्वांनीदेखील ह्याच धर्माचे पालन करावे हीच विनंती आहे.
तुकोबाराय शेवटी म्हणतात धर्माचे रक्षण करणे हेच सर्वांचे मूलभूत कर्तव्य आहे किंबहुना देवाचे देखील तेच कर्तव्य असते आणि त्याचे पालन करण्यासाठीच त्यालादेखील वेळोवेळी मग जन्म घेण्याचे कष्ट करावे लागतात.
==>धर्म म्हणजे ह्यात जो सांगितला आहे तो, येथे हिंदू, मुस्लिम, सिख आणि इसाई ह्या धर्मांबद्दल तुकोबा बोलत नाहीत.
*********************************************
🚩🚩जेव्हा श्री कृष्णाचा गोकुळात जन्म झाला ...
*********************************************
कृष्ण गोकुळी जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ।।
होता कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ।।
सदा नाम वाचे गाती । प्रेमे आनंदे नाचती ।।
तुका म्हणे हरिती दोष । आनंदाने करिती घोष ।।
*******************
तुकाराम महाराज म्हणतात की श्री कृष्ण जेव्हा गोकुळात जन्माला म्हणजे श्री कृष्णाचा जेव्हा गोकुळात जन्म झाला तेव्हा ते ऐकून दुष्टांचा थरकाप उडाला, ते भीतीने चळाचळा कापावयास लागले. ते म्हणतात अशा ह्या श्री कृष्णाचा अवतार येताच लोक घरी आनंद साजरा करू लागले, दिवस सणासारखे साजरे करू लागले.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की जे सदा वाचेने त्याचे नाम घेतात, त्याचे गीत गातात आणि त्याची कथा ऐकताना प्रेमाने आनंदाने नाचतात, तसेच जे सदैव त्याच्या नामाचा आनंदाने जयघोष करतात ते म्हणतात अशांचे दोष आपोआप हरले जातात, ते दोषमुक्त होऊन त्यांच्या पदरी पुण्य येते.
*********************************************
🚩🚩तुकोबा पुढील अभंगात श्री हरीला उद्देशून म्हणतात की अशारितीने भक्तांसाठी नाम-रूप धारण करणाऱ्या तुला कोणीही सर्वाथाने जणू शकत नाही, तुला त्रैलोक्यात खऱ्या अर्थाने जाणू शकणारा कोणीही नाही परंतु तू जर मनात आणलेस तर आणि तरच तुझ्या भक्ताला तुझे स्वरूप सहज कळू शकते आणि आकळू देखील शकते...
*********************************************
तुज वर्णी ऐसा तुजविण नाही । दुजा कोणी तीही त्रिभुवनी ।।
सहस्त्रमुखे शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिवा त्याच्या ।।
अव्यक्ता अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सच्चीदानंदा नारायणा ।।
रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणे ।।
तुका म्हणे जरी दाविसी आपणा । तरिच नारायणा कळों येसी ।।
*******************
तुकाराम महाराज म्हणतात हे श्री हरी, हे नारायणा, येथे तुझी स्तुती करण्यासाठी एक तुझ्याशिवाय आणि तुझ्याव्यतिरिक्त ह्या तिन्ही लोकांत दुसरा कोणीही नाही कारण तुला ओळखणारा तू येथे एकटाच समर्थ असून ते सामर्थ्य इतर कोणताही नाही.
ते म्हणतात सहस्त्र मुखे असलेला तुझा शेष नाग देखील तुझी स्तुती करून शिणला, भागला, बिचाऱ्याच्या धडधाकट असलेल्या जिव्हांना चिरा जायची पाळी आली परंतु तुझी स्तुती काही संपूर्णरीत्या होऊ शकली नाही. ते म्हणतात की असा 'अव्यक्त, अलक्ष, अपार आणि अनंत असलेला तू, निर्गुण सच्चीदानंद नारायण असलेला तू स्वइच्छेनेच रूप आणि नाम धारण करतोस किंवा तुझ्या भक्ताचा जसा तुझ्याप्रती भाव असेल तू त्यासाठी तसाच अवतार घेतोस, म्हणजेच येथे सर्वकाही तुझ्या मर्जीने आणि सत्तेनेच चालते, त्यात इतर कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की त्यामुळे तू जर मनात आणलेस तरच येथे तुला पुजणारे किंवा तुझे भक्तगण तुला ओळखू शकतील अन्यथा नाही. म्हणजे तुला जर स्वतःचे स्वरूप कोणास दाखवावे वाटले किंवा तुला जर तशी इच्छा झाली तरच तुझे स्वरूप बघणाऱ्याला कळून येईल अन्यथा नाही.
अभंग ३१६